पेरूच्या बागेचे 30 लाखांचे नुकसान

सणसवाडीतील शेतकऱ्याला अवकाळी पावसाचा आर्थिक फटका

शिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे पेरूच्या बागेतील तब्बल चार हजार झाडांची फळगळती होऊन तब्बल 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सणसवाडी येथील शेतकरी अनिल बबन दरेकर यांनी दहा एकर क्षेत्रात पेरूच्या व्हीएनआर जातीच्या तब्बल चार हजार झाडांची 2015 मध्ये लागवड केली, अनेक दिवस झाडांची निगा राखल्याने बाग बहरली होती. झाडांना अर्धा किलो, पाऊण किलो ते एक किलो पर्यंत पेरू येऊ लागले होते. यातून दरेकर यांना चांगले उत्पन्नही मिळू लागले होते. काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनाही या बागेतील पेरू

भेट देण्यात आले होते.
सध्या, बागेतूनच पेरूची विक्री होऊन फळांचे व्यापारी हे 40 रुपये किलो दर देत पेरूंची खरेदी करीत होते. दरेकर यांच्या शेतात सध्या प्रत्येक झाडांना 80 ते 100 पेरू लागलेले असताना आणि पेरूंचा आकार व वजन अर्धा किलो दरम्यान असताना सोमवारी (दि. 15) झालेल्या गारांच्या पावसामुळे संपूर्ण पेरूच्या बागेचे नुकसान झाले आहे.

निम्यापेक्षा अधिक जवळपास 80 टक्के फळांची गळती झाली असून झाडांवरील पेरूंनाही गारांचा फटका बसून फळ फुटले आहेत.
यात दरेकर यांचे सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती शेतकरी अनिल दरेकर यांनी महसूल विभागास कळविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयारी नसल्याची खंत दरेकर यांनी व्यक्त केली. तर, ज्याकडे पाहून आनंद व्हायचा, अशा बागेचे मोठे नुकसान झाल्याने आता रडण्याची वेळ आली असल्याचे बबन आबुराव दरेकर यांनी सांगितले.

  • बागेला भेट देण्यासाठी शरद पवार येणार होते…
    सणसवाडी येथील सामान्य कुटुंबातील शेतकरी अनिल दरेकर यांनी त्यांच्या शेतात पिकविलेले पेरू व त्या पेरूंचा मोठा आकार हा परिसरात चर्चेचा विषय झाला होता, त्याचवेळी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे या बागेची पाहणी करण्याकरिता येणार होते. मात्र, अवकाळी पावसाने बाग झोडपून काढल्याने पवार यांना आता आमंत्रण तरी कसे द्यायचे, अशी खंत दरेकर कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
  • शेतकरी दरकेर यांच्या शेतात जाऊन बागेची पाहणी करून पंचनामा करणार आहोत. सदर शेतकऱ्यास शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्यात येईल.
    – चंद्रशेखर ढवळे, मंडलाधिकारी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.