पेपरफुटीवर परीक्षा नियंत्रक अडचणीत!

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 28 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी (लॉ) विषयाच्या प्रश्‍नपत्रिका फुटीवरून विद्यापीठाने परीक्षा व मूल्यमापान मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी दर्शविली आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.1) होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेत डॉ. चव्हाण यांच्यावर विद्यापीठाकडून काय निर्णय घेण्यात येणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे विद्यापीठाच्या शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक आहे. त्यात विधी परीक्षेच्या पेपरफुटीचा मुद्दा अजेंठ्यावर आहे. विद्यापीठातील विधी शाखेच्या प्रश्‍नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच संकेतस्थळावर अपलोड केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावर कुलगुरूंनी चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर परीक्षा मंडळाची बैठक झाली. त्यात पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांच्या कामकाजावर नाराजी व्यक्‍त करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने अधिकृतरीत्या दिली.

विधी शाखेच्या पेपरफुटी बाबतचा संपूर्ण अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडला जाणार आहे. त्यात परीक्षा संचालकांबाबत योग्य तो निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. परीक्षा संचालकांवर नाराजी व्यक्‍त करीत, त्यावर निर्णय घेण्याबाबत विद्यापीठाकडून एवढी अगतिकता का दाखविली जात आहे, असाही प्रश्‍न विद्यापीठ वर्तुळातून निर्माण होत आहे. एवढेच काय, डॉ. अशोक चव्हाण यांचे पद सध्या धोक्‍यात आल्याची चर्चा जोर धरू पाहत आहे.

विद्यापीठ काय पाऊल उचलणार
विद्यापीठाची समाजमनात प्रतिमा उंचावण्यासाठी परीक्षा विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. परीक्षा विभागाकडून जेवढ्या तक्रारी कमी होतील, त्यावर समाजात विद्यापीठाविषयी प्रतिमा सकारात्मक होत असते. त्यातही परीक्षा विभाग नेहमीच संवेदनशील राहिला आहे. अशा परिस्थितीत परीक्षा विभागाची योग्य घडी बसविण्यासाठी विद्यापीठ काय पाऊल उचलणार आहे, हे आता पाहावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.