पेट्रोलपंप दरोड्याच्या तयारीतील आरोपींचा जामीन मंजूर

नायगाव- पुरंदर तालुक्‍यातील झेंडेवाडी येथील पेट्रोल पंपावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये पकडलेल्या एकूण सहा संशयित आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणी किरण रावसाहेब काळे, सचिन रावसाहेब पवार, सचिन चंद्रकांत पवार, संतोष कांतीलाल पवार, गोपाळ किसन पवार आणि सुरज तेजसिंग बगाडे यांना अटक करण्यात आली होती. पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश पी. सी. भगुरे यांनी यांचा जामीन मंजूर केला आहे. 28 जून 2019 रोजी पुणे ते सासवड मार्गावरून संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी मार्गस्थ होत असताना रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे एक पथक दिवे घाट मार्गावर पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दिवे घाटाच्या माथ्यावर्ती 5 ते 6 संशयित व्यक्‍ती फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. सदरील माहितीची शहानिशा करण्यासाठी गेलेल्या पुणे ग्रामीणच्या गुन्हे शोधक पथकाने तीन आरोपींना दारोड्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हत्यारासह ताब्यात घेतले. तसेच अन्य तीन आरोपींना इतर ठिकाणाहून ताब्यात घेतले.

सर्व संशयित आरोपींना सासवड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली होती. त्यामुळे जामीन मिळावा म्हणून सर्व संशयित आरोपींनी ऍड. शिवाजी शेलार, ऍड. मयुर जगताप आणि ऍड. ललिता झेंडे यांच्यामार्फत पुणे सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. त्यास विरोध करताना सदरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर दरोडा, चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना जामिनावर सोडू नये, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत फक्‍त इतर गुन्हे दाखल असल्याच्या कारणामुळे आरोपींचा जामीन फेटाळला जाऊ शकत नाही व आरोपी हे गरीब घरामधील असून ते मोलमजुरी करून पोट भरत असून त्यांच्या कुटुंबीयांची सर्व जवाबदारी त्यांच्यावरती आहे. त्यांनी कोणताही गुन्हा केला नसून त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले असल्याचा युक्‍तिवाद बचाव पक्षाचे वकील ऍड. शिवाजी शेलार आणि ऍड. मयुर जगताप यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने सर्व आरोपींचा जामीन मंजूर केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×