पूर्व हवेली तालुक्‍यात गुटखा विक्री जोरात

कर्नाटकातून सोलापूरमार्गे आवक : एफडीएची कारवाई फक्‍त कागदावरच

सोरतापवाडी – पूर्व हवेली तालुक्‍यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोरतापवाडी, नायगाव, पेठ, तरडे, कोरेगाव मूळ, उरूळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची यासह आदी गावांमध्ये गुटखा व पान मसाल्याची खुलेआमपणे विक्री होत आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून केवळ कारवाईचा फार्स केला जात आहे. कारवाईसाठी पोलीस प्रशासनाला कारवाईला वेळ नाही. तर अन्न, औषध प्रशासनाला सवड नाही, अशी विचित्र परिस्थिती आहे.

सोलापूर जिल्ह्यातून पुणे शहरात येणारी वाहतूक आणि तसेच औद्योगिकदृष्ट्या प्रगत झालेल्या हवेली तालुक्‍याचा चेहरामोहरा गेल्या पंधरा वर्षांत बदलून गेला आहे. सोलापूर महामार्गावरील या गावांचा विकास झाला आहे. तसेच नागरिकीकरण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. तत्कालीन आघाडी सरकारच्या कालावधीत गुटखा बंदी केली होती. त्यानंतर गेल्या सात ते आठ वर्षांत गुटखा बंदी अंमलात आली आहे. मात्र, ही अंमलबजावणी सध्या कागदावरच राहिल्याचे दिसत आहे.

पुणे शहरालगत असलेल्या या तालुक्‍यातील अनेक मोठ्या गावांत गुटखा बंदीचा कायदा धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसत आहे. वाघोली, लोणी काळभोर, उरूळी कांचन येथे गुटखा विक्रीमुळे माफियांनी बस्तान बसविले आहे. सोलापूर जिल्ह्याला कर्नाटकची हद्द आहे. कर्नाटकातून गुटख्याची आवक सोलापूर जिल्ह्यात होत आहे. तिथून हा गुटखा हवेली तालुक्‍यात येत आहे. गुटखामाफियांनी हवेलीत रॅकेट उभे केले आहे. गुटखा विक्रीवर कारवाई करण्यासाठी एफडीए प्रशासन सुस्तावले आहे. गुटखा विक्रेते जोमात आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांत गुटखा विक्री सुरू आहे. विक्रीची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी पोलिसांना फुरसत नाही. अनेक कामांमुळे पोलिसांवर ताण येत आहे. यामुळे गुटखामाफियांचे फावले आहे.

अवैध विक्री होणा-या गुटख्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई सुरू आहे. आगामी काळात ही कारवाई तीव्र करणार आहे. गुटख्याची वाहतूक, विक्री रोखण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्‍त करून तसेच अन्न व औषध प्रशासनाची मदत घेणार आहे.
– सूरज बंडगर, पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर.

दुप्पट नफेखोरी
हवेलीत सोलापूरमार्गे गुटखा येत आहे. कर्नाटकत मिश्र गुटखा विक्रीसाठी तेथील शासनाची परवानगी आहे. तेथील दरात आणि महाराष्ट्रातील दरात एका पुडीमागे सात रुपयांचा फरक आहे. हवेलीतील माफिया आणि विक्रेत्यांकडून यात टक्‍केवारी ठरविली जाते. विक्रेत्यांना पुडीमागे चार रुपयांचा “गाळा’ राहतो. हवेलीत दररोज चार लाखांची उलाढाल होत आहे. यातून महिन्याकाठी सव्वा कोटींची उलाढाल फक्‍त हवेली तालुक्‍यात होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.