पूर्व हवेलीतील शेतकरी चिंताग्रस्त

  • पावसाने दडी मारली : पेरण्या खोळंबल्या
    सोरतापवाडी, दि. 7 (वार्ताहर)- पूर्व हवेलीतील सोरतापवाडी, नायगाव, पेठ, तरडे आदी गावांत पावसाने दडी मारली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा पाऊस जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात बऱ्यापैकी झाला आहे. परंतु पूर्व हवेलीतील भागात पावसाने ओढ दिली आहे. जून महिना कोरडा गेला आहे. जुलै महिन्यात तुरळक प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे शेतातील ढेकळे सुद्धा फुटली नसल्याचे दिसत आहे. तालुक्‍यासह जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पावसावर रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. मात्र, जून व जुलै महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली आहे. पूर्व हवेलीत तुरळक हजेरी लावली आहे. ऐन पेरणीच्या काळात पावसाने दडी मारली असल्याने खरीप हंगाम धोक्‍यात आला आहे. आता दुबार पेरणीवर शेतकऱ्यांची भिस्त आहे. मात्र, ही पेरणी धोक्‍यात आली आहे. हवेत फक्‍त गारवा निर्माण झाला आहे. त्याचा फायदा शेतीला होणार नाही. त्यातच फक्‍त पालखीसाठी नवीन मुठा कालवा तीन दिवस सुरू होता. आता तो बंद असल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. बोअरवरील मोटरी मोकळ्या फिरत असल्याचे दिसत आहे. जमिनीतील ओलावा तीन बोटेसुद्धा खोल गेलेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. येत्या पंधरावड्यात दमदार पाऊस झाला नाही तर पेरण्या होणार नाही. तसेच पाणीटंचाईचे सावट कायम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.