पूर्वलक्षी प्रभावाने शास्ती कर माफ -आमदार जगताप

  • तीन लाख मिळकतींना फायदा : सहाशे चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना पूर्ण माफी

पिंपरी (प्रतिनिधी) – राज्यातील शास्ती लागू असलेल्या मिळकतींना दिलासा मिळाला आहे. 600 चौरस फुटांच्या बांधकामांना पूर्णत: व 601 ते 1000 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना पन्नास टक्के शास्ती कर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्यात आला आहे. मंगळवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा शहरातील सुमारे तीन लाख मिळकतींना फायदा होणार आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंगळवार दि. 29 ला पत्रकार परिषदेत दिली.

सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक विलास मडीगेरी, नामदेव ढाके, सागर आंगोळकर, तुषार कामठे, नगरसेविका माधुरी कुलकर्णी, अमोल थोरात पत्रकार परिषदेला उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना 2008 पासून शास्ती कर लागू केला आहे. त्याची अंमलबजवाणी महापालिकेने सन्‌ 2012 पासून केली. शहरातील अनधिकृत बांधकामाचा शास्ती कर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत त्याच्यावर मोहोर उमटवली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शास्ती कर मिळकत करातून माफ
यापूर्वी ज्या मिळकत धारकांनी शास्ती कर भरला आहे, ती रक्‍कम पुढे मिळकत करातून माफ करण्यात येणार आहे, असेही जगताप यांनी सांगितले. 1001 चौरस फुटांपेक्षा अधिक निवासी बांधकामांना सध्याच्या दरानेच शास्ती कर लागू असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला निर्णय घेतला आहे. शहरवासियांच्या वतीने मी त्यांचे पुण्यात विमानतळावर भेटून आभार मानले आहेत.

एकनाथ पवार म्हणाले, विरोधकांनी शास्ती कर माफीच्या वल्गना केल्या; परंतु भाजपने हा प्रश्न सोडवला आहे. यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मोठा पाठपुरावा केला. पिंपरी-चिंचवड शहरात 4 लाख 86 हजार 715 मिळकती आहेत. त्यापैकी 3 लाख 13 हजार 85 बांधकामे नियमित आहेत. 1 लाख 73 हजार 488 बांधकामे अनधिकृत आहेत. अनधिकृत मिळकतींना 2012 पासून शास्ती कर लागू आहे. गेल्या सहा वर्षांपासून पालिकेने 150.12 कोटी रुपयांचा शास्ती कर वसूल केला आहे. 485.23 कोटी शास्ती कराची थकबाकी आहे. 600 हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामे 32 हजार 774 आहेत. 601 ते 1000 च्या पुढील अवैध बांधकाम शास्तीकर लागू केलेल्या 19 हजार 258 मिळकती आहेत. 1001 च्या पुढील 17 हजार 915 मिळकती, अशा एकूण 69 हजार 947 मिळकती आहेत. तर, बिगर निवासी, मिश्र अशा 8 हजार 916 मिळकती आहेत अशा एकूण 78 हजार 863 मिळकती आहेत.

2012 पासून शास्ती करापोटी वसूल झालेली रक्कम
2012-13 मध्ये 3.47 कोटी रुपये शास्ती कर वसूल झाला होता. 2013-14 मध्ये 37.39 कोटी, 2014-15 मध्ये 23.39 कोटी, 2015-16 मध्ये 8.88 कोटी, 2016-17 मध्ये 9.59 कोटी, 2017-18 मध्ये 60.62 कोटी आणि 2018-19 या चालू आर्थिक वर्षात मे महिन्यापर्यंत 4.34 कोटी असा 150.12 कोटी शास्तीकर वसूल झाला आहे. 2016-17 मध्ये सर्वाधिक 46 कोटी रुपयांचा शास्तीकर वसूल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)