पुस्तकांच्या गावात “इये मराठीचिये नगरी…!’

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम
पाचगणी, दि. 25 (प्रतिनिधी) – 27 फेब्रुवारी हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने याही वर्षी बुधवार, 27 रोजी दु. 4 वाजता पुस्तकांच्या गावातील भिलार, खुल्या प्रेक्षागृहात राज्य मराठी विकास संस्थेतर्फे “इये मराठीचिये नगरी’ हा मराठी भाषेतील वैविध्याचे आणि समृद्धीचे स्मरण करून देणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत आहे, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनन्द काटीकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री, विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या, पुस्तकांचं गाव या प्रकल्पात दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन उत्साहाने साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात, विविधांगी कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलेले आहे. बुधवार, दि. 27 रोजी सायंकाळी 6 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह नरिमन पॉइंट, मुंबई येथे साहित्य व भाषाविषयक पुरस्कार प्रदान सोहळा होत आहे. या कार्यक्रमात मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार, राज्य वायय पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने यंदा मध्यवर्ती संकल्पना म्हणून “मराठी म्हणी’ या विषयाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे, “चला, मराठी ‘म्हण’ जपू या…मराठीचे “धन’ जपू या!’ असा संकल्प करण्याच्या महाराष्ट्र शासनाने केलेल्या आवाहनाची आठवणही डॉ. काटीकर यांनी करून दिली. पुस्तकांच्या गावात होत असलेला “इये मराठीचिये नगरी’ हा कार्यक्रम रसिकांसाठी विनाशुल्क असून मंदार परळीकर, मृण्मयी परळीकर, राहुल जोशी असे अनेक मान्यवर कलाकार यात सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाला भिलार, पाचगणी, महाबळेश्वर, वाई, सातारा, पुणे व नजीकच्या सर्व परिसरांतील रसिकांनी अवश्‍य यावे, असे आवाहन डॉ. आनंद काटीकर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.