“पुलवामा हल्ला’ जैशने भाजपला दिलेली भेट – माजी रॉ प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांचे खळबळजनक वक्तव्य

हैदराबाद – आगामी निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पुलवामा दहशतवादी हल्ला हा जैश-ए-मोहम्मदने भाजपला दिलेली भेट आहे, असे खळबळजनक वक्‍तव्य गुप्तचर संस्था रॉचे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी केले आहे. पण त्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेला एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकची कारवाई योग्य होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इंडियन इकॉनॉनिक ट्रेड ऑर्गनायझेशन 2019च्या कार्यक्रमात दुलत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दुलत म्हणाले, याबाबत याआधीही मी स्पष्टपणे बोललो आहे. जैशने भाजप, मोदी यांना एक भेटच दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या हल्ल्याची भीती व्यक्‍त केली जात होती आणि ती खरी ठरली. त्यानंतर पाकिस्तानात घुसून कारवाई करणे योग्य होते. या हल्ल्याचे आणि त्यानंतर सध्याच्या सरकारने हाताळलेल्या परिस्थितीचे हेच मुल्यांकन असल्याचे प्रथम दर्शनी दिसते.

दुलत यांनी फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा हवाला देत म्हटले की, आपण पूर्वग्रह सोडले पाहिजेत. नाहीतर कट्टर राष्ट्रवाद वाढेल आणि याचा परिणाम युद्धच असेल. दुलत यांनी न्यूझीलंडमधील हल्ल्यानंतर पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांच्या प्रतिक्रियेचे कौतुक केले आहे.

दुलत म्हणाले, आपल्याला काश्‍मीरमधील लोकांशी चर्चा करण्याची गरज आहे. पाकिस्तानसोबतही बोलायला हवे. चर्चेशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. एकवेळ अशी होती की, मनमोहन सिंग सरकार समझोत्यापासून एक पाऊल दूर होते. मनमोहन सिंग आणि मुशर्रफ यांच्यात होणारा करार होता होता राहिला होता. जर तो समझोता झाला असता तर काश्‍मीरमध्ये अशी परिस्थिती उद्‌भवली नसती, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.