पुरुष हॉकी संघाचे श्रीलंकेविरुद्ध 20 गोल 

गतविजेत्यांसमोर उपान्त्य फेरीत मलेशियाचे कडवे आव्हान 
जकार्ता, दि. 28 – गतविजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाने अखेरच्या गटसाखळी लढतीत श्रीलंकेचा 20-0 असा धुव्वा उडविताना आशियाई क्रीडास्पर्धेत आणखी एका दणदणीत विजयाची नोंद केली. गटसाखळीत अपराजित राहिलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघासमोर उपान्त्य फेरीत मलेशियाचे फसवे आव्हान आहे.
भारतीय हॉकी संघाने गटसाखळीत अफलातून कामगिरी करताना आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर तब्बल 76 गोल नोंदविले. तर भारतावर केवळ 3 गोल नोंदविण्यात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना यश मिळाले. श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या सामन्यातही आधीच्या लढतींपेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. विश्‍वक्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाने 38व्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेला जराही संधी दिली नाही आणि प्रतिस्पर्धी बचावफळीच्या चिंधड्या उडविताना नियमित अंतराने गोल केले.
आकासदीप सिंगने (9, 11, 17, 22, 32 व 42वे मिनिट) तब्बल 6 गोल करताना भारताकडून सर्वोत्तम कामगिरी केली. तर आपल्या कारकिर्दीतील द्विशतकी आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा रूपिंदरपाल सिंग (पहिले, 52 व 53वे मिनिट), तसेच हरमनप्रीत सिंग (पाचवे, 21वे व 33 वे मि.) व मनदीप सिंग (35, 43 व 59वे मि.) यांनी हॅटट्रिकची नोंद केली. याशिवाय ललित उपाध्यायने दोन (57 व 58वे मि.), तर विवेक सागर प्रसाद (31वे), अमित रोहिदास (38वे) व दिलप्रीत सिंग (53वे) यांनी प्रत्येकी एक गोल करीत भारताच्या एकतर्फी विजयात वाटा उचलला. भारतीय संघाने सर्व पाचही सामन्यांतील विजयासह अ गटातून पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे उपान्त्य पेरीत त्यांना ब गटातील उपविजेत्या मलेशियाशी झुंज द्यावी लागणार आहे.
त्याआधी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने संपूर्ण वर्चस्व गाजविले. श्रीलंकेला भारतीय गोलच्या दिशेने एकही फटका लगावता आला नाही. तसेच श्रीलंकेला संपूर्ण सामन्यांत एकही पेनल्टी कॉर्नर मिळविता आला नाही. त्याउलट भारताने श्रीलंकेच्या गोलच्या दिशेने तब्बल 46 फटके मारले व त्यातील 20 वेळा लक्ष्यवेध केला. भारताने सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना नियमित गोलरक्षकही काढून घेत त्याच्या जागी जादा खेळाडूला आणले. भारताने 12 मैदानी गोल केले, तर 7 गोल पेनल्टी कॉर्नरवर लगावले. एक गोल पेनल्टी स्ट्रोकवर नोंदविला गेला.
दरम्यान महिला हॉकी स्पर्धेतील उपान्त्य फेरीचे सामने उद्या होणार असून पहिल्या लढतीत गेल्या स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारतीय महिला संघासमोर गतस्पर्धेतील रौप्यविजेत्या चीनचे आव्हान आहे. तर दुसऱ्या उपान्त्य लढतीत जपानसमोर गतविजेत्या कोरियाचे आव्हान आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)