पुरग्रस्त केरळवासियांच्या पाठीशी देश उभा: पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: केरळ आणि देशाच्या इतर भागातल्या पूरग्रस्तांच्या पाठीशी या संकटकाळात संपूर्ण देश पाठीशी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या “मन की बात’ या कार्यक्रमाच्या 47 व्या भागात ते बोलत होते. धैर्य आणि हिंमतीच्या बळावर केरळमधली जनता या आपत्तीतून सावरत पुन्हा उभी राहील असा ठाम विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. राज्यातल्या जनतेचे दु:ख, लवकरात लवकर कमी व्हावे, यासाठी प्रत्येक जण झटत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

हवाईदल, नौदल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल. धडक कृती दलाच्या जवांनांनी, पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आदर्श भूमिका बजावली. नैसर्गिक आपत्तीत, आपत्ती व्यवस्थापनाची महत्वाची भूमिका असते. पुढच्या महिन्यात येणाऱ्या अभियंता दिनी, अभियांत्रिकी स्थापत्याचे नवे प्रकार, पर्यावरण-स्नेही बांधकाम, यांना प्राधान्य देत त्यावर विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संसदेचे नुकतेच संपलेले पावसाळी अधिवेशन फलदायी ठरल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. लोकसभेत 21 तर राज्यसभेत 14 विधेयके संमत झाल्याची माहिती त्यांनी दिली. हे अधिवेशन सामाजिक न्याय आणि युवा कल्याणासाठीचे अधिवेशन म्हणून स्मरणात राहील, असे ते म्हणाले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अधिकारांचे रक्षण करणारे सुधारणा विधेयकही संमत झाले आहे. यामुळे अनुसूचित जाती-जमाती अत्याचारविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध होईल आणि दलित समाजाला आत्मविश्वास प्राप्त होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

कोणत्याही सुसंस्कृत समाजात महिलांविरुद्धचा अन्याय खपवून घेतला जात नाही. गुन्हेगारी कायदा सुधारणा विधेयक संमत करुन यासंदर्भातल्या गुन्हेगारांना कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 12 वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तिहेरी तलाक संदर्भातले विधेयक लोकसभेत संमत झाले. मात्र राज्यसभेत अद्याप संमत झाले नसल्याचा उल्लेख करुन मुस्लीम महिलांना सामाजिक न्याय प्रदान करण्यासाठी संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे उत्कृष्ट संसदपटू, संवेदनशील कवी, उत्तम वक्ता आणि लोकप्रिय पंतप्रधान म्हणून देश नेहमीच स्मरण करेल. 91 वा सुधारणा कायदा 2003 आणून भारताच्या राजकारणात दोन महत्वाचे बदल घडवून आणल्याबद्दल देश कृतज्ञ राहील, असे पंतप्रधान म्हणाले.

जकार्ता इथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या पदकविजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले. पदकविजेत्यांमधे मुलींची संख्या मोठी असणे हे सकारात्मक चिन्ह असल्याचे ते म्हणाले. अनेक पदकविजेते छोट्या शहर आणि खेड्यातून येऊन आपल्या मेहनतीच्या बळावर यश प्राप्त करत आहेत ही लक्षणीय बाब आहे.

संस्कृत दिनानिमित्त बोलताना, ही वैभवशाली संस्कृती जतन करणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. पुढच्या महिन्यात पाच तारखेला येणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त त्यांनी विज्ञान, शिक्षण आणि विद्यार्थ्यांप्रती बांधिलकी जपणाऱ्या शिक्षकांना नमन केले. रक्षाबंधनानिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)