पुरंदरसाठी गुंजवनीचे पाणी “मृगजळ’च

राजकीय कुरघोड्यात योजना अडकली; 95 टक्के पूर्ण केलेला प्रकल्प काही नियम व अटीत रेंगाळला

नीरा- पुरंदरच्या जनतेचे स्वप्न असणारे गुंजवनीचे पाणी निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे निवडणुकीचा जुमालाच ठरू पाहात आहे. गुंजवनीचे दोन टीएमसी पाणी पुरंदरच्या वाट्याला आले असले तरी यावर मोठे राजकारण होताना दिसत आहे आणि म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून गुंजवणी प्रकल्प रखडत गेला आहे. तत्कालीन आघाडी सरकारने 95 टक्के पूर्ण केलेला हा प्रकल्प केवळ काही नियम व अटी तसेच राजकारणात अडकला आहे.

गुंजवणी प्रकल्पाची सुरवात झाली तेंव्हा तो वेल्हा, भोर व पुरंदरच्या शेतीसाठी वरदान ठरणारा प्रकल्प आहे, असे वाटत होते. प्रकल्पाच्या जुन्या आराखड्यानुसार पुरंदरच्या दक्षिण भागाला या धरणाचे पाणी मिळणार होते. याभागातील लोकांनी सुरवातीला या प्रकल्पाचे जोरदार स्वागत केले. यावेळी पुरंदर मधील याच भागातील लाभ क्षेत्रातील लोकांनी आपल्या जमिनी धरणामुळे विस्तापित होणाऱ्या लोकांसाठी दिल्या. 10 एकर रानवड जमिनी पेक्षा 5 एकर बागायती जमीन बरी.., म्हणत या भागातील लोकांनी जमीन अधिग्रहनास विरोध केला नाही. मात्र, अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतरही या लोकांना गुंजवानीचे पाणी मिळेनासे झाले. त्यामुळे पुरंदरच्या या भागातील राख, गुळूंचे, पिंपरे, हरणी, वाल्हे, वीर या भागातील लोकांनी या पाण्याची आशा सोडून दिली होती. मात्र, विजय शिवतारे पुरंदर मध्ये आले आणि त्यांनी पुरंदरच्या लोकांना पुन्हा एकदा गुंजवनीच्या पाण्याचे स्वप्न दाखवायला सुरवात केली. त्यासाठी त्यांनी गुंजवनीचे पाणी न मिळण्यासाठी केवळ पवार कुटुंबीय जबाबदार असल्याचे सांगायला सुरवात केली. लोकांमध्ये पवार कुटुंबा बद्दल द्वेष पेरत, द्वेषाच्या तापलेल्या तव्यावर पुरंदरच्या आमदारकीची भाकरी भाजून घेतली. मात्र, आपल्या आमदारकीच्या पहिल्या टर्म मध्ये ते पुरंदरला पाणी आणू शकले नाहीत आणि याचे खापर त्यांनी आघाडी सरकारवर फोडत पुन्हा एकदा आमदारकी मिळवली. आमदारकीच्या काळात 5 टक्के धरणाचे राहिलेले काम पूर्ण करणारे शिवतारे आपल्या मंत्री पदाच्या चार वर्षाच्या कार्यकाळातही गुंजवनीचे पाणी पुरंदर मध्ये आणू शकले नाहीत आणि म्हणूनच शिवतारे यांनी घाईघाईत प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. किवा आपण गुंजवणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किती प्रयत्नशील असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या अंगलट आल्याचे दिसत आहे. जनते समोर बोलताना त्यांनी गुंजवणी प्रकल्पासाठीच्या दोन हजार परवानग्या आपण घेतल्या असल्याचे म्हंटले होते. मात्र, योग्य परवानग्या घेतल्या नसल्यानेच या प्रकल्पाच्या बंदनलिका योजनेला ब्रेक लागला आहे.

पुरंदरमध्ये पाणी आणण्यासाठी शिवतारे यांनी भोर, वेल्ह्यातील लोकांना विश्वासात घेणे आवश्‍यक होते. मात्र, मंत्रीपदाचा दबाव अधिकाऱ्यांवर टाकून त्यांनी केवळ कागदी घोडे नाचवल्याचे पुढे आले आहे. नियमा प्रमाणे काम करणार असल्याचे प्रतिज्ञा पत्र लिहून देण्याची नामुष्की कृष्णा खोरे विकास महामंडळावर आली आहे. पुरंदरला पाणी आणण्यासाठी शिवतारे यांनी येथील पिक पद्धती बदलून लोकांपुढे पिक पद्धती बदलाचे मोठे संकट निर्माण केल्याची भवना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. गुंजवणीचे पाणी पुरंदरला जावू नये याकरिता प्रयत्न करणाऱ्यांना आंदोलने उभी करण्यासाठी मोठे बळ मिळाले आहे.
गुंजवनीच्या पाण्यावर भोर, वेल्हा व पुरंदर या तीनही तालुक्‍यांचा हक्क आहे. भोर, वेल्ह्यातील लोकांच्या जमिनी जशा प्रकल्पासाठी गेल्या त्याच प्रमाणे पुनर्वसनासाठी पुरंदरच्या जमिनी सुद्धा गेल्या आहेत. मात्र, भोर व वेल्ह्यातील राजकीय पुढारी याबाबत केवळ राजकारणच करताना दिसतात. धरण पूर्ण असताना व त्यात पाणी असताना सिंचन योजना पूर्ण न झाल्याने याचा वापर करता येत नाही. पर्यायाने हे पाणी नीरा नदीत सोडावे लागत आहे. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा पुरंदर, भोर, वेल्ह्याच्या पुढाऱ्यांनी एकत्र बसून जनतेच्या प्रश्‍नावर तोडगा काढायला हवा. मात्र, केवळ राजकारणच करायचे, असे ठरविलेले पुढारी जाणतेसाठी एकत्र बसायला कसे धजावतील? अशी जोरदार चर्चा आहे.

  • मूळ लाभार्थ्यांनी हक्कावर सोडले पाणी…
    पुरंदर तालुक्‍यातील या प्रकल्पातील मूळ लाभार्थी आता या प्रकल्पावर कोणतेही भाष्य करीत नाहीत. गेली अनेक वर्ष म्हणजेच 30 ते 35 वर्ष पाण्याची प्रतीक्षा या लोकांनी केली आहे. आजाने पाहिलेले स्वप्न आता नातुही पाहून थकला आहे आणि म्हणूनच या भागातील पाणी वळवून पुरंदरच्या दुसऱ्या भागात नेले जात असले तरी त्यांनी कधीही विरोध केलेला नाही. याउलट कोणाला ही द्या, पण पाणी द्या. असे म्हणत आपल्या हक्काच्या पाण्यावर त्यांनी पाणी सोडले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.