पुरंदरमध्ये कूल कॅनच्या अप्रमाणित पाण्याचा गोरखधंदा

फुकटच्या पाण्यावर लाखोंची उलाढाल

सासवड- पुरंदर तालुक्‍यातील सासवड, जेजुरी, नीरा या मुख्य शहरांसह तालुक्‍यातील ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर अनधिकृत वॉटर प्लॅंटद्वारे कूल कॅन आणि जारमध्ये पाणी विकण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोणत्याही नियमांचे पालन न करता अप्रमाणित पाणी शुद्धतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. तरीही प्रशासनाकडून कोणावरही कारवाई केली जात नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

मागील काही वर्षांपासून केवळ उन्हाळ्यात नव्हे तर वर्षभर कूल कॅनमधील पाणी विकण्याचा व्यवसाय पुरंदर तालुक्‍यात तेजीत सुरू आहे. सध्या प्रत्येक जण आरोग्याला जपत असल्याने पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळण्याचा प्रयत्न करीत आहेत. तालुक्‍यातील हॉटेल, पानटपरी यासह पाणपोईवर सुद्धा त्याद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्याद्वारे मिळणारे पाणी शुद्ध असल्याची जणू काही मानसिकताच पुरंदरकरांमध्ये तयार झाली आहे किंवा ती तयार करण्यात आली आहे. कूल कॅनचा व्यवसाय थाटण्यासाठी शुद्धतेच्या दृष्टीने कोणत्याही नियमांचे पालन करण्यात येत नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असून नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे.

तालुक्‍यातील वॉटर प्लांटची संख्या शेकडोंच्या घरात गेली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्यवसायिक परवाना, अन्न व औषध प्रशासनाचे कोणतेही प्रमाणपत्र न घेता नागरी वस्तीमध्ये वॉटर प्लांट मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत आहेत. त्यामधील पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करणे गरजेचे असताना मात्र, अशा कोणत्याही नियमावलीचा विचार केला जात नाही. पाणी थंड व नितळ केले की ते थेट 15 ते 20 लिटरच्या कॅनमध्ये भरले जाते. वाहनाद्वारे घरपोच सेवा मिळत असल्याने त्याची मागणी वाढली आहे. एका कॅनमागे तीस ते चाळीस रुपये घेतले जात आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने कूल कॅनच्या पाण्याची उलाढाल होत आहे. यामधून वॉटर प्लांटधारक लाखोंची कमाई करीत आहेत.

संपूर्ण तालुक्‍यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्‍यातील पिण्यायोग्य पाण्याच्या साठ्यांची पातळी खालावली असून पिण्यायोग्य पाणीसाठ्यांमध्ये झपाट्याने घट होत आहे. यामुळे तालुक्‍यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कूल कॅनवरच अवलंबून रहावे लागत आहे. तहानेने कासावीस झालेले ग्राहक शुद्ध आणि अशुद्धतेचा विचार न करताच कूल कॅन विकत घेऊन आपली तहान भागविताना दिसत आहेत. पाणी टंचाईने हैराण झालेल्या पुरंदरच्या जनतेच्या आरोग्याशी चाललेला हा जीवघेणा खेळ थांबणार तरी कधी? याचे उत्तर मात्र कोणाकडेही नाही.

कूल कॅन प्लॅंटधारक टॅंकरने पाणी विकत घेऊन कूल कॅनच्या नावाखाली सर्रासपणे विक्री करीत आहेत. तालुक्‍यातील ज्या गावात पुरंदर उपसा जलसिंचनचे पाणी येते. त्याठिकाणी तर पुण्यातील गटारांचेच पाणी जे शेतीसाठी देखील अपायकारक आहे तेच पाणी विहीरीत सोडून टॅंकरने या प्लॅंटला पुरविण्यात येत असल्याचे ही आढळून आले आहे. एवढे सगळे होत असूनही पुरंदरचा आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

 • आजार उद्भविण्याची दाट शक्‍यता
  थंड पाण्याचे जार म्हणजेच कूल कॅनच्या पाण्याचा उन्हाळ्यात आणि लग्नसमारंभासह छोट्या-मोठ्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. हे पाणी पिल्याने घशाचे आजार होत असून काही नागरिकांना सर्दीचाही त्रास मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कॅनच्या पाण्यामुळे डायरिया, गॅस्ट्रोसारखे आजार पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आपण पाणी विकत घेत असलेल्या वॉटर प्लांटने रीतसर परवाना घेतलेला आहे का? तसेच पाण्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध खरचं केले जात आहे का? याची पडताळणी करणे गरजेचे बनले आहे.
 • वॉटर प्लॅंटच्या पाण्याची आजपर्यंत तपासणीच नाही?
  पुरंदर तालुक्‍यातील वाढत्या वॉटर प्लॅंटच्या आणि त्यांच्या मार्फत वितरित केल्या जाणाऱ्या कूल कॅनच्या पाण्याची आजतागायत एकदाही कोणत्याही विभागाने तपासणीच केलेली नाही. वॉटर प्लॅंटधारकांनी दर सहा महिन्यांतून एकदा जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोग शाळेत पाणी तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. तपासणीनंतर पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून देण्यात येतो; परंतु तालुक्‍यातील किती प्लांटधारक अशाप्रकारे पाणी तपासणी करून त्याचा अहवाल घेतात हा एक मोठा संशोधनाचा विषय बनला आहे. त्यामुळे तालुक्‍यातील वॉटर प्लांट आणि कूल कॅन पुरवठा करणाऱ्या वितरकांवर तात्काळ प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे बनले आहे.
 • सासवड नगर परिषद हद्दीमध्ये जे सध्या वॉटर कूल कॅन अथवा जार मार्फत पाणी पुरविण्यासाठीचे प्लांट उभारण्यात आले आहेत. यापैकी एकाही प्लांटधारकांनी नगरपरिषदेकडून परवाना घेतलेला नसल्यामुळे हे सर्व प्लांट अनधिकृत आहेत. या प्लांटधारकांनी तात्काळ नगरपरिषदेकडून अधिकृत परवाना घेऊन त्यानंतरच अशा प्रकारे पाण्याचे वितरण करावे, अन्यथा नगरपरिषदेकडून या सर्व प्लांट द्वारे वितरित करण्यात येणाऱ्या कूल कॅनमधील पाण्याची तपासणी करून दोषी प्लॅंटधारकांवरती कारवाई करण्यात येईल.
  मोहन चव्हाण
  आरोग्याधिकारी नगर परिषद सासवड

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.