पुरंदरमधील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व 

पाच पैकी तीन ताब्यात तर एक कॉंग्रेसकडे, एक बिनविरोध 
माजी जि.प सदस्य मनीषा काकडे पुरस्कृत पॅनेल भुईसपाट 
वाल्हे: पुरंदर तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यापैकी तीन ग्रामपंचायतीत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून एक ग्रामपंचायत कॉंग्रेसच्या खात्यात गेली आहे. चिव्हेवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी शासनाकडून महादेव कोळी जातीचे दाखले मिळत नसल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. शेवटच्या क्षणी येथे केवळ सरपंच पदासाठी दिपक चिव्हे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने ते बिनविरोध सरपंच झाले. पांगारे, घेरा पुरंदर व नवलेवाडी या तीन ग्रामपंचायतीत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवले असल्याची माहिती नवनिर्वाचित सभापती अर्चना जाधव यांनी दिली.
पांगारे गावात सर्वाधिक लक्षवेधी लढत झाली. येथे कॉंग्रेसच्या माजी जि. प. सदस्या मनीषा काकडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल अक्षरशः भुईसपाट झाले. शिवसेनेने येथे आठही जागांवर विजय मिळवला. एकूण 1152 मतांपैकी 792 मते मिळवीत शिवसेनेच्या किरण सीताराम शेलार यांनी एकहाती विजय मिळवला. कॉंग्रेस पुरस्कृत नितीन अशोक कुंभार यांना अवघ्या 345 मतांवर समाधान मानावे लागले.
घेरा पुरंदर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या अनिल श्रीरंग रांजणे यांनी सरपंचपदी विजय मिळवला. येथे सदस्यपदाच्या सात जागांपैकी तीन जागा रिक्त राहिल्या तर निवडणूक झालेल्या चारही जागांवर सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. नवलेवाडी ग्रामपंचायत निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली असून येथे सरपंचपदी शिवसेनेच्या कविता उमेश वाघोले यांची निवड झाली आहे. उर्वरित सातही सदस्य बिनविरोध निवडून आले. खेंगरेवाडी शिंदेवाडी ग्रामपंचायतीत कॉंग्रेसचे दत्तात्रय तुकाराम खेंगरे यांना निसटता विजय मिळाला. सदस्यपदाच्या सात जागांपैकी एक जागा रिक्त राहिली तर उर्वरित सहापैकी चार जागा कॉंग्रेसच्या आणि दोन जागा सेनेच्या खात्यात गेल्या.
गावनिहाय निवडून आलेले सरपंच… 
पांगारे – सरपंच किरण सीताराम शेलार (शिवसेना)
घेरापुरंदर – सरपंच – अनिल श्रीरंग रांजणे (शिवसेना)
नवलेवाडी – सरपंच – कविता उमेश वाघोले (शिवसेना)
खेंगरेवाडी – शिंदेवाडी – सरपंच – दत्तात्रय तुकाराम खेंगरे (कॉंग्रेस)
चिव्हेवाडी – सरपंच – दिपक धोंडीबा चिव्हे (बिनविरोध)
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)