अग्रलेख | पुन्हा “हिंदी-चिनी भाई भाई’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या चीन दौऱ्यात फारसे काही हाती लागणार नाही, असे बोलले जात होते. कारण या दौऱ्यात कोणताही अधिकृत करार होणार नव्हता. या दौऱ्याचे स्वरुप अनौपचारिक होते. तरीही मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर अनेक महत्वाच्या विषयांवर आश्‍वासक चर्चा केली आणि सीमेवर शांतता राखण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले, हे विशेष मानावे लागेल.

शी जिनपिंग आता त्या देशातील सर्वात शक्तीमान नेते झाले आहेत. तहहयात अध्यक्ष बनण्याची कामगिरी त्यांनी करुन दाखवली आहे.त्यामुळे साम्राज्यवादी चीनची कमान सांभाळताना त्यांनाही आपली ताकद दाखवून देण्याची उर्मी असणार आहे. भारताच्या आक्रमकपणामुळे डोकलाममधून घ्यावी लागलेली माघार चिनी नेत्यांना जिव्हारी लागली आहे, हे वास्तव आहे. डोकलमा भागात चीनने सुरु केलेली बांधकामे आणि वाढती सैन्यसंख्याच पुरेशी बोलकी आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग काही वर्षापूर्वी भारताच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा मोदी यांनी त्यांना गुजरातची सफर घडवली होती आणि साबरमतीच्या काठी झोपाळ्यावर बसून दोघांनी “चाय पे चर्चा’ केली होती. त्याचप्रमाणे मोदी यांच्या या दौऱ्याचे स्वरुप असेल, अशी शक्‍यता होती. त्याप्रमाणे उभय नेत्यांनी एका सरोवराच्या काठी बसून “चाय पे चर्चा’ केलीच. पण तरीही ही अनौपचारिक चर्चा थोडी आश्‍वासकच मानावी लागेल.

गेल्या वर्षभरात डोकलामच्या विषयावरुन दोनही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. लष्करी संघर्षाची भीती निर्माण झाली होती. दोनही देशांनी संयम दाखवून संघर्ष टाळला असला, तरी अविश्‍वासाचे वातावरण तयार झाले होते. दरम्यानच्या काळात मोदी आणि जिनपिंग जागतिक व्यासपीठावर एकमेकांना भेटले असले तरी देशांमधील तणाव कायम होता. हा तणाव कमी करुन काही प्रमाणात विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्याचे काम मोदी यांच्या या भेटीने निश्‍चित केले आहे.

लष्करी संघर्ष टाळण्यासाठी यापुढे दोन्ही देश राजनैतिक संवाद वाढवण्यावर भर देणार आहेत. भारत-चीन सीमेवर शांतता, सौहार्द टिकून राहण्यात दोन्ही देशांचे हित आहे. त्यामुळे यापुढे दोन्ही देशांच्या लष्करामध्ये विश्‍वासाचा पूल तयार व्हावा, संवाद वाढवण्याठी दोनही देशांच्या लष्कराला रणनितीक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. फक्त लष्करीच नाही, तर अन्य क्षेत्रांमध्येही भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले आहे.

या अनौपचारिक शिखर परिषदेत कुठल्याही करारावर स्वाक्षरी झाली नाही किंवा कोणतीही मोठी घोषणा झाली नाही.चीनच्या “वन बेल्ट वन रोड प्रोजेक्‍ट’ आणि डोकलामवर कोणतीच चर्चा झाली नसल्याचे परराष्ट्र खात्यानेच स्पष्ट केले असल्याने, याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. या बैठकीत व्यापारवृद्धी, संस्कृती आणि “पीपल-टू-पीपल रिलेशन’ मजबूत करण्यावरही भर देण्यात आला. अध्यात्म, तंत्रज्ञान, व्यापार आणि मनोरंजनासह अनेक क्षेत्रात एकत्र काम करण्यावर भर देण्यात आला. शिवाय हिंदी चित्रपट चीनमध्ये तर चिनी चित्रपट भारतात दाखविण्याचेही या बैठकीत ठरले आहे.

खरे तर उभय देशांमध्ये अनेक वादग्रस्त विषय प्रलंबित असूनही त्यापैकी कोणत्याही मुद्याला स्पर्श न करण्याचा धोरणीपणा उभय नेत्यांनी दाखवला असल्याने पुन्हा “हिंदी चिनी भाई भाई’ हे गाणे म्हणत, गात गळ्यात गळे घातले जात असले, तरी थोडी सावधगिरी दाखवावीच लागणार आहे. कारण डोकलाम मुद्यावरून दोन्ही देशांमध्ये सातत्याने वाद निर्माण होत आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणावरही त्याचा परिणाम होत आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझर याच्यावर बंदी घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनने केलेला विरोध, भारताच्या एनएसजी सदस्यत्वालाही चीनने केलेला विरोध आणि भारतानेही पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाकिस्तानच्या सहकार्याने सुरू असलेल्या चीनच्या प्रकल्पाला केलेला विरोध या मुद्यांवर जोपर्यत तोडगा निघत नाही, तोपर्यंत उभय देशांमध्ये तणाव कायम राहणार आहे. अर्थात भारत आणि चीन यांनी अफगाणिस्तानमध्ये प्रथमच संयुक्त आर्थिक प्रकल्पावर एकत्र काम करणार असल्याने काही प्रमाणात पाकिस्तानला धक्का देण्याचे काम मोदी आणि जिनपिंग यांनी केले असले, तरीही चीनचा पाकिस्तानकडे असलेला ओढा विसरता येणार नाही.

म्हणूनच मोदी यांच्या या चीन दौऱ्याचे मूल्यमापन करताना इतिहाकडेही पहावे लागणार आहे. नेहरुंच्या काळात “हिंदी चिनी भाई भाई’ अशी घोषणा गाजली असली, तरी त्यानंतर चीनने केलेला विश्‍वासघात आणि भारताच्या माथी मारलेले युध्द कधीच विसरता येणार नाही. भारताला गाफील ठेवत एखादे धाडस करण्याचे काम चीन सातत्याने करत आला आहे. त्यामुळे इतर सर्व क्षेत्रात भारताशी सहकार्य करताना चीन कधी डोकलामचा विषय पुढे आणेल काहीही सांगता येणार नाही. शी जिनपिंग आता त्या देशातील सर्वात शक्तीमान नेते झाले आहेत.

तहहयात अध्यक्ष बनण्याची कामगिरी त्यांनी करुन दाखवली आहे. त्यामुळे साम्राज्यवादी चीनची कमान सांभाळताना त्यांनाही आपली ताकद दाखवून देण्याची उर्मी असणार आहे. भारताच्या आक्रमकपणामुळे डोकलाममधून घ्यावी लागलेली माघार चिनी नेत्यांना जिव्हारी लागली आहे, हे वास्तव आहे. डोकलमा भागात चीनने सुरु केलेली बांधकामे आणि वाढती सैन्यसंख्याच पुरेशी बोलकी आहे. केवळ योग्य संधीची वाट पहात राहण्याचे काम चीनकडून केले जाईल आणि वेळ येताच डाव साधला जाईल, हे उघड आहे.

लष्करी संघर्ष टाळण्यासाठी यापुढे दोन्ही देश रणनितीक संवाद वाढवण्यावर भर देणार असले तरी हा संवाद कितपत गांभिर्याने साधला जाईल याचीही शंका आहे. म्हणूनच भारताला आगामी काळात सावधच रहावे लागणार आहे. जोपर्यंत भारताचा खरा मित्र म्हणून चीन स्वत:ची प्रतिमा निर्माण करीत नाही तोपर्यंत चीनच्या प्रत्येक हालचालीकडे संशयानेच पाहण्याशिवाय पर्याय नाही. जगातील दोन सर्वात मोठ्या देशांना जोडणारी “हिंदी चिनी भाई भाई’ ही संकल्पना आदर्श असली, तरी ती तेवढी वास्तववादी नाही, हे भारतीय नेत्यांनी समजून घेण्याची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील अग्रलेख वाचण्यात आला हिंदी चिनी बाहि बाही म्हणावयाचे तर ह्यात एकातरी बाबतीत साम्य पाहावयास मिळते का ? त्याच प्रमाणे भोगोलिक दृष्टया चीन व भारत हा कधीतरी एक देश होता का ? आज भारत चीनचे पायपुसणे होण्यास तयार होण्याचे कारण त्याची पाकिस्तानला मिळणारी सर्व प्रकारची मदत व वेळोवेळी भारताच्या विरोधात मिळणारा पाठिंबा जे कदापि शक्य नाही त्याच्या पाठीमागे लागण्याची गरज काय ? आता जर भारताचे काही प्रकल्प , धोरणे , आर्थिक नुकसान अथवा भारताच्या सर्वांगीण प्रगतीच्या आड चीन धोंड म्हणून वाटत असेल तर वरील होणारे प्रयत्न योग्य ठरले असते परंतु आजच्या स्थितीत भारत कोणत्याच बाबतीत चीनशी बरोबरी करू शकत नाही हे वास्तव मानावे लागेल चीन त्याच्या देशासाठी अंतर्गत कम्युनिस्ट असला तरी जागतिक स्थरावर तो व्यापारी बनत चालला आहे याचमुळे त्याचा भारताकडे पाहण्याचा एकमेव दृष्टिकोन बाजारपेठ हाच आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तान हिंदुस्थानला स्वात्यंत्र मिळण्या अगोदर अनेक वर्ष हिंदुस्तान हा संपूर्ण एकसंघ देश होता पाकिस्तान हे नाव सुद्धा अस्तित्वात नव्हते देशात इतर समाजा प्रमाणे मुस्लीम समाज सुद्धा ह्या देशाचा अविभाज्य घटक होता ह्या समाजाने सुद्धा स्वात्यंत्र मिळविण्यासाठी महत्वाचे योगदान दिलेले आहे अनेक बाबतीत साम्य एकरूपता पाहावयास मिळते आजच्या परिस्थितीत भारत -पाकिस्तान संबंधाचे विशलेषण करावयाचे झाल्यास एकाच कुटुंबातील दोन संख्या भावांचे भांडण असेच करावे लागेल हे मान्य असल्यास प्रथम वरील प्रकारचे प्रयत्न भारत प्काकिस्तान भाई भाई ह्या दृष्टीने व्हावयास हवा व त्यानंतर हिंदी चिनी भाई भाई चा विचार होणे गरजेचे वाटते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)