पुन्हा इच्छुकांच्या आशा पल्लवित

पिंपरी- पवार कुटुंबातून केवळ आपणच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर केल्याने शहरातील कित्येक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पार्थ पवार लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे शरद पवार यांनी मंगळवारी जाहीर केले. या घोषणेने शहर आणि मावळ परिसरातील राजकीय समीकरणे तातडीने बदललू लागली. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ लोकसभा क्षेत्रामध्ये सक्रिय झाले होते. त्यांच्या सक्रियतेने विरोधकांसोबतच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या इच्छुकांनाही धडकी भरली होती. इतकी वर्षे पक्षाचे काम केल्यानंतर आता अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, तेव्हा पक्षश्रेष्ठींची नवी पिढीच संधी हिरावून घेत असल्याचे शल्य स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना सतावत होते. शरद पवार यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मावळ लोकसभेसाठी उमेदवार कोण? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. परिणामी, इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याची राष्ट्रवादीत चर्चा रंगू लागली आहे.

मावळात सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पराभवाची कटू चव चाखावी लागत आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाने कोणत्याही स्थानिक नेत्याला संधी न देता थेट राहुल नार्वेकर यांना आयात केले होते, परिणामी 2014 च्या निवडणुकीत मतमोजणींच्या फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. या निवडणुकीनंतर सातत्याने प्रश्‍न उपस्थित केला जात होता की, लोकसभा निवडणूक लढवू शकेल अशा ताकदीचे नेतृत्त्व स्थानिक पातळीवर उभे करण्यात पक्षाला अपयश आले आहे का? गेल्या निवडणुकीत “मोदी लाटे’समोर निभाव लागणे अवघड असल्याचा अंदाज सर्वच नेत्यांना होता. परंतु यंदा चित्र बदलले आहे. एकीकडे लाट ओसरली आहे आणि दुसरीकडे युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर सेना-भाजपमधील दरी काही कमी झाली नाही. ही अनुकूल परिस्थिती पाहता राष्ट्रवादीकडून मावळसाठी कोण उमेदवार असणार? याबाबत उत्सुकता होतीच. दीड महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश आढावा बैठकीत शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी मावळातून लढण्याची इच्छा व्यक्‍त केली होती. त्यानंतर पवार कुटुंबातील नवी पिढी अर्थात पार्थ पवार यांची अचानकच इंट्री झाली. माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यातील हेवीवेट मराठा नेते अजित पवार यांचे चिरंजीव असे प्रसिद्धीचे वलय असलेल्या पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा परिसरात दौरे आणि भेटी-गाठी सुरू केल्याने भल्या-भल्यांची झोप उडाली होती. पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांना भेट देत, इच्छुकांना थेट आव्हान निर्माण केले होते. अगदी कालपर्यंत पार्थ पवारचा मावळात दौरा सुरु होता.

दरम्यान, मावळ लोकसभेसाठी पारंपारिक शत्रू असलेल्या खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात पारंपारिक लढत होईल, असे चित्र होते. मात्र, पार्थ पवारच्या राजकारणातील नुसत्या चर्चेनेच या मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली. खासदार बारणे यांना आपल्यासमोर कोणीही टिकू शकणार नाही, असा आत्मविश्‍वास आहे. तर आमदार जगताप यांनी मावळ लोकसभा उमेदवारीबाबत अद्यापपर्यंत सोयीस्कर मौन बाळगले आहे. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, शिवसेनेच्या वाट्याचा मावळ लोकसभा मतदार संघ भाजपकडे घेत, आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी द्यावी, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. तसेच शिवसेनेने बारणे यांना उमेदवारी दिल्यास त्यांचे काम न करण्याचे आताच जाहीर केले आहे. यामधून स्थानिक पातळीवरील भाजप नेत्यांनी भविष्यातील राजकारणाची दिशा दर्शविली आहे.
राष्ट्रवादीचा विचार करता, पार्थच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, आता पार्थ लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने, पुन्हा इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मावळ लोकसभेकरिता मी स्वत: आणि भाऊसाहेब भोईर असे दोघे जण इच्छुक आहोत. पक्षाध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मिळणाऱ्या आदेशानुसार मावळ लोकसभा निवडणुकीचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे. पार्थ पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असो किंवा नाही, अन्यथा इतर कोणत्याही इच्छुकास उमेदवारी दिल्यास, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करून विजय खेचून आणणार आहोत.
संजोग वाघेरे
अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
पिंपरी-चिंचवड शहर

Leave A Reply

Your email address will not be published.