पुण्यात शिक्षणातले “मिशन काश्‍मीर’ 

शिल्पा देशपांडे 

जम्मू-काश्‍मीरमधल्या दहशतवादाच्या छायेत असणाऱ्या तेथील बर्फात धुमसणारी पण स्वावलंबी होण्याची अनेक काश्‍मिरी मुलींची मनीषा पुण्याची भूमी पूर्ण करत आहे आणि विद्येचे माहेरघर ही बिरुदावली खऱ्या अर्थाने सार्थ करत आहे. त्याची ही कहाणी… 

कुपवाडा, बिरुवा, अनंतनाग या काश्‍मीर खोऱ्यातील मुलींना स्वावलंबनाची जाणीव करून दिलीय 22 वर्षांपासून तेथे काम करत असलेल्या “बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेने! वास्तविक पाहता एखादी सामाजिक संस्था विविध सामाजिक प्रश्नावर काम करते यात नवीन नाही; परंतु त्या अतिसंवेदनशील भागात राहून राष्ट्रीय स्तरावरील प्रश्‍नांची दाहकता कमी करण्याचे काम काही सोपे नाही. राजकीय, आर्थिक आणि प्रसिद्धीचे कोणतेही पाठबळ नसतानाही उच्च इच्छाशक्ती व जिद्द यांच्या जोरावर संवेदनशील क्षेत्रामध्ये तेथील अनाथ मुली मग त्या दहशतवादी हल्ल्‌यात अनाथ झाल्या असतील किंवा खुद्द त्याचे वडील दहशतवादी असतील आणि पोलिसांच्या/लष्कराच्या चकमकीत मरण पावले असतील अशा सगळ्या अनाथ मुलींसाठी घर उभे करणे हे काही सामान्य काम नाही. पुण्यात ही संस्था हे काम करत आहे परंतु संस्थेच्या प्रसारापेक्षाही कामाचा अभ्यास करणे आजच्या विचारवंत, राजकीय तसेच सामाजिक विश्‍लेषकांनी जास्त हितकारक ठरेल कारण काश्‍मीर प्रश्‍नामध्ये मानसिक परिवर्तन, हा मुद्दा विशेष अभ्यासाचा असल्याचे मत अनेक विचारवंतांनी मांडले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यामध्ये काश्‍मिरी मुली विविध शिक्षण संस्थेतून शिक्षण घेत आहेत. या मुलींचा भौगोलिक, धार्मिक तसेच मानसिक प्रवास निराळा आहे, हे नक्की. शिवाय या सगळ्यातून तेथील लोकांचा तयार होणारा दृष्टिकोन प्रवाहाला दिशा देणारा ठरतो. जन्मांपासूनच जिथे बॉम्बस्फोट, गोळीबार आणि भीतीचे, दहशतवादाचे सावट आहे, तिथे महिला सबलीकरण, स्वातंत्र्य, स्वावलंबन, समान हक्‍क या सुशिक्षित वातावरणातील, समाजातील शब्द निरर्थक ठरतात. सामान्य जीवन अर्धे संचारबंदीत तर अर्धे अनिश्‍चित संकटांनी घेरलेले आहे, नागरी सुविधा, शिक्षण तसेच वैद्यकीय सुविधाही पुरेशा नसलेल्या या काश्‍मीर खोऱ्यातील या पुण्यात शिक्षण घेत असलेल्या काश्‍मिरी मुली परिवर्तनाच्या प्रतिनिधी आहेत
अनंतनाग या छोट्याशा गावातून पुण्यात येवून मीर मसरत नर्सिंग शिकत आहे. तिला त्यात उच्च शिक्षणही घ्यायचे आहे. ती सांगते की, पुण्यातून आम्हाला विविध प्रसंगी सगळ्यांनी मदत केली आहे. आता शिक्षण पूर्ण करून पुन्हा काश्‍मीरमध्ये जाऊन सामाजिक व वैद्यकीय सेवा करायची इच्छा आहे. या प्रवासात बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन ही संस्थाही खूप साथ देत आहे. प्रवेशापासून राहणे खाणे सर्व मदत समंजस पुणेकर मोठ्या आस्थेने करत आहेत, असे मीर सांगते.

एकीकडे काश्‍मीर धुमसत आहे गेल्या दोन दशकापासून; पण त्याचबरोबर पुण्याच्या मातीने त्यांना आपलेसे केले आहे. शिक्षणाची व स्वावलंबनाची दिशा दाखवली आहे. पुण्यातील विविध संस्थेमधून या काश्‍मिरी कळ्या विकसित होत आहेत; आणि एक प्रकारे शांतीचा दरवळ पसरवत आहेत. असे असले तरी काही विचारवंताचा त्रासही सहन करावा लागला, काही अडचणीही आल्या कायदेशीर कागदांची पूर्तता, येथील शहरी तसेच सामाजिक वातावरणाशी मिळतेजुळते घेताना सर्व प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे जाणारा त्यांचा प्रवास निश्‍चितच कौतुकास्पद ठरतो आहे.

कॉम्युटर्स, ऍनिमेशन, नर्सिंगचे शिक्षण या मुली घेत आहेत पुण्यातील शारदा निकेतनमध्ये अशा 11 मुली राहतात. त्यांचे स्थानिक पालकत्व पुण्यातीलच युवकांनी स्वीकारले आहे. या मुली शिकून स्वावलंबी होतील आणि संवेदनशील भागातील अनेक मुलींनाही मदत करतील असा विश्वास या मुलींनी निर्माण केला आहे. याविषयी बोलताना बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन-जम्मू अँड काश्‍मीरचे संचालक अधिक कदम यांनी “प्रभात’ला सांगितले की, प्रत्येक मुलगी मातृत्व घेऊनच जन्माला येते. त्यामुळे काश्‍मीर सारख्या दहशतवादी छायेत असूनही आमच्या घरातील या मुली शिक्षणाचा प्रसार आणि त्याद्वारे शांतिदूतांचे काम करतील. याच फौंडेशनचे जम्मू मधील सूत्रधार गिरीधर दफतरी सांगतात की, काश्‍मीरी लोकांमध्ये प्रेम आणि विश्‍वासाची भावना जागृत केल्यास राज्यामधली स्थिती बदलू शकते. पुण्यातली बॉर्डरलेस ही संस्था असे काम करत असून शिक्षणापासून वंचित असलेल्या काश्‍मिरी मुलींना शिक्षण दिल्याने त्यांच्या जीवनात एक नवी हसरी सकाळ उगवत आहे, ही मोठी गोष्ट आहे. काश्‍मीर प्रश्‍न सुटेल तेंव्हा सुटेल पण महिला सबलीकरणाचा महामेरू दहशत वादाच्या हिमालयात राहून पेलणे नक्कीच आव्हानात्मक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)