पुण्यात लवकरच दुसरा सिरो सर्व्हे

केंद्रीय मंत्री जावडेकर : ऍन्टिजेन टेस्ट वाढवण्यावर भर

पुणे – शहरात करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी बाधित भागांतील नागरिकांच्या ऍन्टिजेन चाचण्या वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. यामुळे संसर्गाचे निदान तत्काळ होऊन बाधितांना उपचार मिळण्यास मदत होईल. तसेच केंद्र सरकारच्या मदतीने पुणे शहरात दुसरा सिरो सर्व्हे करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती प्रसारण व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

पुण्यात विधानभवनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना आढावा बैठकीनंतर जावडेकर बोलत होते.

‘करोनाला रोखण्यासाठी पुढील महिनाभरात कोणत्या उपाययोजना करावयाच्या यासंदर्भात बैठकीत व्यूहरचना आखण्यात आली,’ असे सांगत जावडेकर म्हणाले, ‘शहरातील कंटेन्मेंट झोन असलेल्या बाधित भागांतील नागरिकांच्या ऍन्टिजेन चाचण्या करून किती जणांना लागण झाली, याचे तातडीने निदान होणार आहे. शहरात होणाऱ्या दुसऱ्या सिरो सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात सॅम्पल घेण्यात येतील.’

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “रिक्त पदांची भरती प्रकिया सुरू आहे. करोनाच्या अनुषंगाने तात्पुरती मनुष्यबळ भरती करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी टेली-एक्सरे सुविधा देणार आहे. खासगी रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या देयकांचे लेखापरीक्षण करा. त्यामध्ये ऑक्सिजन दर, पीपीई संच इत्यांदी बाबी शासन नियमांप्रमाणे आकारणी केली आहे का? त्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “जम्बो कोविड रुग्णालयातील उपचारांबाबतची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये महापौरांनी दर आठवड्यात चार रुग्णालयांच्या कामकाजाची माहिती घेऊन चित्रफीत सादर करावी.’

 

शहरात व्हेंटिलेटरसह ऑक्सिजन पुरवठ्यात तुटवडा आहे. पीपीई किट्स, आरटी-पीसीआर किट्सबाबत केंद्र सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दिल्लीत बैठक घेण्यात येईल. बैठकीत पुण्याच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. राज्य सरकारला सहकार्य केले जाईल. करोना निर्मूलनासाठी पुण्याचा जो काही वाटा असेल तो केंद्र सरकार निश्चित उचलेल.

– प्रकाश जावडेकर, केंद्रीय माहिती, प्रसारण व पर्यावरणमंत्री

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.