पुण्यात कालवा फुटल्याने दौंड, इंदापुरातील आवर्तने बंद

लोणी काळभोर- नवा मुठा उजवा कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे जिल्ह्याच्या पूर्व भागातील हवेली, दौंड व इंदापूर तालुक्‍यातील 66 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीला आगामी काळात कालव्यामधून पाणी मिळणे अत्यंत कठीण आहे. जलसंपदा विभागाच्या हलगर्जीपणामुळे या तीनही तालुक्‍यातील कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
हवेली, दौंड व इंदापूर तालुक्‍यातील 66 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांना मूठा उजव्या कालव्यामधून पाणी पुरवठा होतो. खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणातील पाणी या कालव्यामधून तीन तालुक्‍यातील शेतीला व पुणे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. काही वर्षांपूर्वी पुणे शहराची लोकसंख्या कमी होती. त्यावेळी साडेसहा टीएमसी पाणी पुणे शहराला पिण्यासाठी पुरेसे होते. नंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे ते साडेअकरा टीएमसी करण्यात आले. आता ते जवळपास 14 टीएमसी पर्यंत वाढले आहे. पुणे शहराची पाण्याची मागणी साडेसहा टीएमसी वरून चौदाटीएमसी पर्यंत गेल्याने शेतीला उपलब्ध होणारे पाणी फार मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण असा नविनच वाद यामुळे उभा राहिला आहे. आगामी काळात या वादाचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटणार आहेतही काळ्या दगडावरची रेघ आहे.
खडकवासला धरण साखळीतील चारही धरणात चालू वर्षी चांगल्या प्रकारे पाणीसाठा झाला होता. खडकवासला धरणातून नवा मुठा उजव्या कालव्यातून शेतीला व बंद पाइपलाइन मधून पुणे शहराला पिण्यासाठी पाणी पुरविले जात आहे. शेतीला सोडण्यात येणारे कालव्यातील पाणी कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे बंद करण्यात आले आहे. या कालव्याची दुरुस्ती होईपर्यंत कालव्यामधून शेतीला सोडण्यात येणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना मात्र, घाम फुटणार आहे. कारण यंदा पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात सरासरी इतकाही पाऊस पडला नाही. त्यामुळे विहिरींना आताच पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत कसोटीचे असणार आहेत.

  • इंदापूर तालुक्‍यावर सतत अन्याय
    आघाडी सरकार 1999 ते 2014 अशी सलग पंधरा वर्षे राज्यात सत्तेवर होते. या काळात अपवाद वगळता राष्ट्रवादीचे अजित पवार व कॉंग्रेसचे हर्षवर्धन पाटील हे सतत मंत्री होते. हे दोघेही खडकवासला धरण साखळीतील पाणी वाटपात जिल्ह्याला झुकते माप देत असत अशी चर्चा जनतेमध्ये आजही सुरू असते. मात्र, भाजप व शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यावर इंदापूर तालुक्‍यावर कालव्याच्या पाण्याबाबत सतत अन्याय होत आहे अशी तेथील शेतकऱ्यांची भावना आहे. ज्या प्रमाणे राहुल कुल हे दौंड मधील शेतीला नवीन व जुन्या मुठा कालव्यामधून पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करतात किंवा आग्रही असतात त्या तुलनेत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे कमी पडतात असा आरोप विरोधक करत असतात.
  • इंदापूरची स्थिती आणखी गंभीर होणार
    इंदापूर तालुक्‍यात तर यंदा पाऊस पडलाच नाही. त्यामुळे तेथे सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. गेल्या आठवड्यात नवा मुठा कालव्यामधून इंदापूर तालुक्‍यातील शेतीला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यातच कालवा फुटल्यामुळे आगामी काळात काही दिवस कालव्याचे पाणी बंद राहणार आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची अवस्था गंभीर होणार आहे.
  • कालव्यावरच विहिरीतील पाण्याचे भवितव्य
    हवेली, दौंड, इंदापूर या तीनही तालुक्‍यातील कालव्याच्याकडेला बहुतेक ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. या विहिरीतून पाणी उपसून गावांना पिण्यासाठी पुरविले जाते. कालव्याला पाणी असल्यानंतर या विहीरींना भरपूर पाणी असते. कालव्याला पाणी नसल्यास या सर्व पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी लक्षणीयरित्या कमी होते. त्यामुळे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. कालव्याला जर महिन्यापेक्षा जास्त काळ पाणी नसल्यास बहुतेक विहीरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर असतात.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)