पुण्यात आता अशांतता नांदते

– अंजली खमितकर

पुणे – शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, सुरक्षितता, निवांतपणा, मोठे रस्ते, शैक्षणिक आणि माहिती तंत्रज्ञानाचे हब, नैसर्गिक सुबत्ता, सांस्कृतिकदृष्ट्या एकजिनसी अशी पुण्याची ओळख काही घटनांमुळे बदलत चालली आहे. माओवादी, दहशती कारवाया, चळवळीतील कार्यकर्त्यांचे खून या सगळ्यांनी पुण्यात शांतता नांदते असे म्हणणे आता चुकीचे ठरणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवृत्तीनंतर पुण्यात राहण्याचा विचार करणारा माणूस केवळ उर्वरीत आयुष्य सुरक्षित आणि शांततेत घालवण्याचे उद्दिष्ट ठेवत असे. त्यानुसारच त्याची पूंजी तो येथे “इन्व्हेस्ट’ करत असे. शिक्षणसंस्था होत्या, बकालपणा अजिबात नव्हता. या शांत वातावरणामुळेच एनडीए, सदर्न कमांड, एअरफोर्स स्टेशन, दारूगोळा फॅक्‍टरी, एनसीएल यासह अनेक संस्था पुण्यात निर्माण करण्यात आल्या.

शैक्षणिक हबमुळे अनेक अनेक भागातून विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येत. यामुळे पुण्याचा विकास होऊ लागला. माहिती तंत्रज्ञान कंपन्या आल्या आणि विकासाच्या दृष्टीने शहराचा चेहरा मोहराच बदलू लागला. रस्ते, घरे यांची स्टाइल बदलली. त्यामागून येणाऱ्या मुलभूत सोयी सुविधांची मागणी सुरू झाली त्यातूनच मेट्रो सारख्या गोष्टी शहरात आल्या.

उत्तरेकडील राज्यांना सतत बसणारा भूकंपाचा धक्का, अति पाऊस, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधील अराजकता, देशाच्या सगळ्या किनाऱ्यांकडील प्रदेशामध्ये सतत असणारी वादळाची भिती, गुजरात-राजस्थानला जोडून असणारी पाकिस्तान बॉर्डर म्हणजे सतात युद्धजन्य परिस्थिती, घुसखोरी, सैन्याच्या कारवाया, ब्रह्मपुत्रेचे खोरे, तेथील प्रदेश तर सतत या नदीच्या लहरीपणामुळे अस्थिर असलेला अशी परिस्थिती या काही राज्यात आहे. या सर्वातून सुटलेले मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि महाराष्ट्र ही राज्ये आहेत. त्यातून मध्यप्रदेशात चंबळचे खोरे, डाकूंची भिती असलेला, छत्तीसगढ हा नक्षलवादी कारवायांचा भाग. त्यामुळेच महाराष्ट्र हा सर्वात सुरक्षित मानला जातो. महाराष्ट्रातही नागपूर, विदर्भ, मराठवाडा सोडला तर पश्‍चिम महाराष्ट्र हा हवामान आणि अन्य बाबींनीही सधन आहे. त्यात येणारे पुणे शहर हे शैक्षणिक आणि राहाण्याच्या दृष्टीनेही योग्य असल्याने त्याला “लिव्हेबल सिटी’चा दर्जा देण्यात आला.

मात्र, याच विकासाबरोबर दहशतवाद, नक्षलवादी चळवळींनीही याठिकाणी आपले बस्तान बसवायला सुरूवात केली. त्याचीच परिणती म्हणजे आजची ही अशांततामय परिस्थिती आहे.

“शेजारी खरा पहारेकरी’ अशी कोणे एकेकाळी म्हण होती. मात्र आता फ्लॅट संस्कृतीमुळे तीही पुसली गेली. शेजारी कोण राहते, परिचय काय वगैरे या गोष्टी “प्रायव्हसी’च्या नावाखाली कधीच विचारात घेतल्या जात नाहीत आणि अतिरेक्‍यांचे यामुळेच फावते आणि गुप्तचर कारवायांना वाव मिळतो. पुणे जसे चांगल्या गोष्टींनी “इंटरनॅशनल कॅन्व्हास’वर गेले तसे दहशतवादी कारवायांनीही ते गेले. किंबहुना येथे काही अघटित केले, तर त्याची जगात चर्चा होते. या विचारांनीच जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोट, फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारातील स्फोट या आणि अनेकदा मिळणाऱ्या धमक्‍या, “सनबर्न’ सारखे कार्यक्रम उडवून लावण्याचा केलेला “प्लॅन’ असे प्रकार घडवून आणून त्याची चर्चा जगाच्या पातळीवर करायला भाग पाडले जाते. सनातन्यांचे पुणे तसेच पुरोगाम्यांचेही हे पुणे आहे. पुण्यात अनेक चळवळींनी जन्म घेतला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांनीही पुरोगामित्त्वाची चळवळ याच शहरातून सुरू केली आणि वाढवलीही. परंतु अशा कारवाया करणाऱ्या संघटनांना जगात जो संदेश पोहोचवायचा आहे, तो बरोबर पोहोचवला जातो. त्यासाठीच आता पुण्याचा वापर होऊ लागला आहे.

यामध्ये पोलिसांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. वाढलेले शहर, उपनगरांमधील अस्ताव्यस्तता यामुळे पुणे जिल्ह्यातच दोन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करावी लागली. त्यावरून शहराचा वाढता विस्तार आणि वाढते गुन्हेगारीकरण याचा विचार गांभीर्याने करणे आवश्‍यक आहे. मात्र, या तुलनेत पोलिसांची भूमिका मात्र अतिशय तकलादू आहे. एकाच हाताच्या बोटावर मोजण्याइतके अधिकारी सोडले तर संपूर्ण पोलीस खात्यात एकही अधिकारी पुण्याची नस ओळखणारा नाही. त्यामुळे शहराविषयीचा इतिहास-भूगोलच त्या अधिकाऱ्याला माहित नसेल, तर तो प्रभावी पोलीसिंग कसा करणार, हा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो. येणारा अधिकारी हा तीन वर्षे काम करायचे आहे. त्यामुळे ती तीनवर्षे “अर्थार्जन’ करून आरामात पुढील “क्रीम’ पोस्टिंगसाठी निघून जातो. मात्र शहरावरचा वाढता धोका कमी करण्याचा प्रयत्न अजिबात केला जात नाही. एवढी संकटे आली, तरी शहरावर घोंगावणारे हे अशांततेचे वादळ घालवून देण्याचा तर लांबच परंतु कमी करण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून केला जात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)