पुण्यातूनही आपची माघार

पुणे – आम आदमी पक्षानेही महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षाचा या लोकसभेसाठी पुण्यातही उमेदवार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपकडून सुभाष वारे हे रिंगणात होते. त्यांना 28 हजार मते मिळाली होती. दरम्यान, मनसे प्रमाणेच आपकडूनही भाजपविरोधात प्रचार केला जाणार आहे. आम आदमी पक्षाच्या राज्य कार्यकारिणी व राष्ट्रीय राजकीय निर्णय समितीत झालेल्या या निर्णयाची माहिती शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी दिली.

महाराष्ट्रात मत विभागणी टाळण्यासाठी लोकसभेसाठी उमेदवार उभे न करता भाजपला पराभूत करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे किर्दत यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे मनसे पाठोपाठ आता आपही निवडणूक रिंगणात नाही. मागील निवडणुकीत मनसे आणि आपचा उमेदवार असल्याने पुण्यातील लोकसभेची निवडणूक चौरंगी झाली होती. त्यात आता या दोन्ही पक्षाचे उमेदवार नसल्याने पुण्यात कॉंग्रेस आणि भाजपमध्येच रंगत होणार असून मनसेची एक लाख आणि आपची 25 हजार मते कुणाच्या पारड्यात जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, आपकडून अद्याप कोणत्याही पक्षाला पाठींबा देण्यात आला नसला तरी, पक्षाचा सूर भाजपविरोधात असल्याने तसेच मनसेही भाजपविरोधात सभा घेणार असल्याने या सव्वालाख मतांचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.