पुण्यातील सराईत गुन्हेगाराची हत्या

कोडीत येथे हसन शेख याच्यावर गोळीबार व कोयत्याने हल्ला

सासवड – पुण्यातील सराईत गुन्हेगार हसन अब्दुल जमील शेख याची कोडीत (ता.पुरंदर) येथे गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. धायरी येथील रायकर मळा येथे राहणारा हसन शेख हा सिंहगड रोड पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता.

सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे शहरातील सराईत गुन्हेगार अशी ओळख असलेल्या हसन शेख याच्यावर खून व खुनाचा प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला अटकही करण्यात आली होती. सध्या, तो जामिनावर होता. आज, (दि.2) गुरूवार असल्याने नेहमी प्रमाणे हसन शेख नारायणपूर येथील मंदिरात दर्शनासाठी आला होता. दर्शनानंतर नारायणपूर येथून कोडीत रस्त्याने कारने पुण्याकडे जात असताना कोडीत गावच्या हद्दीत अज्ञात हल्लेखोर बोलेरो जीपमध्ये आले, त्यांनी शेख यांच्या कारला समोरून धडक दिली. बोलेरोत तीन आरोपी होते. सदर बोलेरो ही चोरीची होती, त्यानंतर नेमके त्याचवेळी पाठीमागून चार दुचाकी वरून आलेल्या 12 ते 13 हल्लेखोरांनी हसन शेख याच्या कारवर बेछूट गोळीबार केला. यावेळी तब्बल 11 राऊंड फायर करण्यात आले. यापैकी चार गोळ्या शेख याला लागल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. चार गोळ्या हसन शेख याला लागल्यानंतर हल्लेखोरांनी त्याला गाडीतून बाहेर ओढून काढीत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करीत त्याचा निर्घृणपणे खून केला, त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

सासवड पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मयत शेख याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथील ससून इस्पितळात पाठविला. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सासवडचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप करीत आहेत.

पूर्वीही झाला होता शेखवर गोळीबार…
हसन अब्दुल जमील शेख याच्या हॉटेल राज गार्डन येथे त्याच्यावर 2015 मध्ये हल्ला झाला होता. त्यावेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्‌यात तो गंभीर जखमी झाला होता, त्यानंतर तो काही काळ कोमात होता. त्यातून सावरल्यानंतर त्याने आता हॉटेल आणि जमिन खरेदीविक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक केली होती, त्याच्या खुनाची सुपारी दिली असल्याचा संशय होता. आज सकाळी पुन्हा त्याच्यावर अशाच प्रकारे हल्ला करून शेख याचा खून करण्यात आला.

सदर गुन्ह्यांसंदर्भातील काही संशयीतांची नावे समोर आली असुन त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. सर्वच पातळींवर तपास वेगाने सुरू आहे.
– जयंत मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, बारामती ग्रामीण

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.