पुण्यातही “एक मराठा, लाख मराठा’ची गर्जना

निषेध मोर्चा : आरक्षण, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.29 – मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर सरकारने गुन्हे दाखल केले आहेत, ते तत्काळ मागे घ्यावेत. मराठा समाजाच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात या तसेच इतर विविध मागण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्यातर्फे रविवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. यात मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते. दरम्यान, यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोर्चाची सुरूवात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर हा मोर्चा जंगली महाराज रस्त्याने बालगंधर्व येथून महापालिका भवन येथे आला. तेथून शिवाजी रस्त्याने शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मोर्चाचा समारोप झाला.

“मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,’ “शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे,’ “आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या,’ “एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा मोर्चात देण्यात आल्या. मोर्चाला सुरूवात झाल्यानंतर पोलिसांनी मोर्चा मार्गावरील वाहतूक बंद ठेवली. त्यामुळे मोर्चात सहभागी झालेल्यांना अडचण निर्माण झाली नाही. हा मोर्चा शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आल्यावर निषेध सभा घेण्यात आली.

या आंदोलनात शहीद झालेल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मोर्चाच्यावतीने तयार करण्यात आलेले निवेदन वाचून दाखविण्यात आले. यात “हे सरकार सोशल मीडियाचा वापर करुन मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आरक्षणाच्या मुद्यावरही सरकार फारसे गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. मराठा समाजाला आता आश्‍वासने-भाषणे-चर्चा नकोत, तर ठोस निर्णय व रिझल्ट पाहिजे. राज्यातील बदलेली परिस्थिती चिघळविण्यात सरकारची बेपर्वाई आणि असंवेदनशील धोरण कारणीभूत आहे’ असा आरोपही या निवेदनाद्वारे करण्यात आला. याची एक प्रत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठेवण्यात आली. त्यानंतर 15 मिनिटांचे ठिय्या आंदोलन करून मोर्चाचा समारोप करण्यात आला.

राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, बाळासाहेब अमराळे, तुषार काकडे, रघूनाथ चित्रे पाटील, विकास पासलकर, धनजंय जाधव, अभयसिंह अडसुळ यांनी मोर्चाचे संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)