पुण्याच्या वाहतूक कोंडीत वारकऱ्याचा बळी

दोन्ही बसमधून मार्ग काढताना चेंगरुन मृत्यू

पुणे,दि.27 – वाहतूक कोंडीत अडकलेला वारकरी दोन्ही पीएमपी बसमधून मार्ग काढत असताना चेंगरला गेला. उपचारा दरम्यान त्याचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना स्वारगेट एसटी स्टॅंडच्या बाहेर घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात अज्ञात पीएमपी चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धोंडीबा भिका जाधव(65,रा.चासकमान, ता खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गोटीराम मगर(45,रा.चासकमान, ता.खेड) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत देऊबाई जाधव याही जखमी झाल्या आहेत. हा अपघात 13 जुलै रोजी घडला होता. तर धोंडीबा यांचा मृत्यू उपचारादरम्यान मंगळवारी झाला.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्वारगेट एसटी स्टॅंडच्या बाहेर रात्री सव्वा नऊच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी एसटी स्टॅंडच्या बाहेर गर्दीत दोन पीएमपी बस एकामागे एक उभ्या होत्या. दोन पीएमपी बसमधून जाण्यासाठी थोडी वाट होती. यावेळी धोंडींबा आणी देऊबाई या तेथून वाट काढत चालले होते. देऊबाई या पुढे तर धोंडीबा हे मागे होते. दरम्यान बसचालकाने अचानक बस सुरु केल्याने देऊबाई या धक्का बसून पुढच्या बाजुला पडल्या. त्यांना मुका मार लागला तर धोंडींबा हे दोन्ही बसमध्ये अडकून खाली पडले. ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांना खेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए.एस.लाहोटे यांनी दिलेल्या माहितीनूसार धोंडीबा जाधव हे शेतकरी असून ते नियमीत बारीला जातात. गावातील इतर वारकऱ्यांसोबत ते पंढरपूरला गेले होते. पंढरपूरवरुन ते एसटीने स्वारगेटला आले. तेथून शिवाजीनगरला गावची गाडी पकडण्यासाठी ते चालले होते. दोन्ही बसमधून मार्ग काढत असताना पुढची बस वाहतूक सुरळीत झाल्याने चालकाने ब्रेकवरील पाय काढून ऍक्‍सीलेटर वाढवत असतानाच बस थोडी मागे सरकली. यामध्ये दोन्ही बसमध्ये अडकून ते गंभीर जखमी झाले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)