पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी डॉ.के.व्यंकटेशम

पुणे – पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांची बदली करण्याचे आदेश सोमवारी गृहविभागाने दिले. पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी डॉ. के. व्यंकटेशम यांची नेमणूक झाली आले. तर, पिंपरीचे पहिले पोलीस आयुक्त होण्याचा मान आर. के. पद्मानाभन यांना मिळाला आहे. दरम्यान, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) प्रमुखपदी संजीव सिंघल यांची नेमणूक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यांच्या जागी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे निश्‍चित होते. मात्र, गृहविभागाकडून याबाबत अधिकृत आदेश देण्यात आला नव्हता. गृहविभागाने राज्यातील अकरा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश सोमवारी दुपारी दिले. पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांची बदली अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) म्हणून नियुक्ती करण्यात आली. अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) आर. के. पद्मानाभन यांची पिंपरीच्या पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली.
दरम्यान, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख संजय कुमार यांची नवी मुंबईत पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीव सिंघल यांची सीआयडीच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. राज्य कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली. दरम्यान रश्‍मी शुल्का यांनी पुणेकरांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, शहरातील कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यात पुणेकरांनी मला सहकार्य केले. माझ्या आयुष्यातील दु:खद घटनांमध्ये पुणेकर माझ्या पाठीशी उभे राहिले. ज्येष्ठ नागरिक कक्ष, महिला सुरक्षिततेसंदर्भात विविध उपक्रम राबविण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला. पुण्यातील कार्यकाळ उत्तम पार पडला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)