पुणे – 90 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

सात दिवसांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश

पुणे – महापालिकेच्या 90 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही या कर्मचाऱ्यांकडून अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून या कर्मचाऱ्यांना सात दिवसांची मुदत दिली आहे.

महापालिकेच्या वेगवेगेळ्या पदांवर आरक्षित जागेतून कर्मचारी भरती केली जाते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना नोकरीसाठी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राचे जात वैधता प्रमाणपत्र विहीत मुदतीस सादर करावे लागते. तसेच शासनाकडूनही वेळोवेळी कार्यालयीन आदेशांद्वारे महापालिकेकडून ही माहिती मागविली जाते. मात्र, ती दिली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी अजूनही जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेली नाहीत त्यांनी सात दिवसांच्या आत ही जात वैधता प्रमाणपत्रे सादर करावीत, ज्यांनी वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत, त्यांनी अर्जांची प्रत सादर करावी तसेच ज्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला नाही त्यांनी आपले अर्ज सामान्य प्रशासन विभागाकडे सात दिवसांच्या आत सादर करावेत, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास तसेच काही अडचण उद्‌भवल्यास संबंधित कर्मचाऱ्याची नोकरी धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.