पुणे – 7 शिक्षणाधिकाऱ्यांवर नोटीसास्त्र

“पवित्र’ पोर्टल आढावा बैठकीस गैरहजेरी भोवली

पुणे – राज्य शासनाच्या “पवित्र’ पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्याबाबतच्या आढावा बैठकीस गैरहजर राहिलेल्या राज्यातील सात शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षण आयुक्तांनी “कारणे दाखवा’ नोटीस बजाविली आहे. मुदतीत समाधानकारक खुलासा सादर न केल्यास या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात दि. 1 व 2 फेब्रुबारीला राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित केली होती. “पवित्र’ पोर्टलद्वारे शिक्षक भरती, बिंदूनामावलीची नोंदणी, शिक्षकांचे समायोजन याबाबतच्या विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. जिल्हानिहाय प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांकडून लेखी स्वरुपात माहिती दाखल करुन घेण्यात आली.

आढावा बैठकीसाठी प्रतिनिधी न पाठविता शिक्षणाधिकाऱ्यांनी आवश्‍यक व परिपूर्ण माहितीसह स्वत: उपस्थित राहण्याबाबतचे आदेश शिक्षण आयुक्तांकडून 23 जानेवारीलाच सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना बजाविले होते. पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची असतानाही राज्यातील सात शिक्षणाधिकारी बैठकीस गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहे.

या अधिकाऱ्यांना नोटीस
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सोलापूरचे एस.डी.राठोड, जालना-पी.एल.गव्हाणे, अहमदनगर-आर.एम.काटमोरे, भंडारा-एल.एल.पाच्छापुरे, यवतमाळ-सु.र. रोडगे तर माध्यमिक शिक्षण विभागातील उस्मानाबाद- शिवाजी चंदनशिवे, जालना-एस.एस.चौधरी या शिक्षणाधिकाऱ्यांचा गैरहजेरीच्या यादीत समावेश झालेला आहे. या सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे.

काय म्हटले आहे नोटिशीत?
बैठकीला गैरहजर राहण्याची कृती ही वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणारी असून शासनाच्या धोरणात्मक प्रक्रियेस बाधा आणणारी आहे. मंगळवारी (दि.5) सकाळी 11 वाजता शिक्षण आयुक्त कार्यालयात समक्ष हजर राहून खुलासा सादर करावा. हा खुलासा मुदतीत सादर न केल्यास व खुलासा समाधानकारक नसल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण आयुक्तांनी नोटीसमध्ये नमूद केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)