पुणे – 39 साखर कारखान्यांच्या मालमत्तेवर “टाच’?

संग्रहित छायाचित्र....

“एफआरपी’प्रकरणी साखर आयुक्‍तालय करणार जप्तीची कारवाई

पुणे – पहिल्या टप्प्यात उसाची रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) न देणाऱ्या 39 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे 16 कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाचे परिणाम जाणवू लागल्याचे चित्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्तालय कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले होते. तब्बल आठ तास सुरू असलेल्या या आंदोलनानंतर अखेर “एफआरपी’ थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे लेखी आश्‍वासन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. यानुसार आयुक्‍तांनी कारवाई सुरू केली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात 39 कारखान्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे, तर 135 कारखान्यांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. या नोटिस काढलेल्या कारखान्यांची सुनावणी 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यात पुणे आणि कोल्हापूर विभागाची व 2 फेब्रुवारी रोजी उर्वरित महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची सुनावणी करण्यात येणार आहे.

जप्तीची कारवाई करण्यात येणाऱ्या कारखान्यांकडे सुमारे 1,521 कोटी 37 लाख रुपयांची थकबाकी आहे. साखर आयुक्तालयाकडून शून्य ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत “एफआरपी’ न दिलेल्या संबंधित 39 साखर कारखान्यांच्या वेळोवेळी सुनावणी घेतल्या आहेत. या कारखान्यांकडे 1,813 कोटी 81 लाख रुपयांची “एफआरपी’ची थकबाकी होती. नोटिसा काढण्यात आल्यानंतर या कारखान्यांनी सुमारे 292 कोटी 44 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा केले आहेत. मात्र, उर्वरित सुमारे 1,521 कोटी 37 लाख रुपये थकित असल्याने त्यांच्यावर ही कारवाई केली जाणार आहे.

जिल्हानिहाय कारवाई होणारे कारखाने
जप्ती कारवाईत कोल्हापूर-8, सांगली-5, सातारा-3, सोलापूर-6, बीड-4 , जळगाव-1, जालना-2, परभणी-2, उस्मानाबाद-2, लातूर-2, नगर-2, औरंगाबाद-1 आणि नागपूरमधील एका कारखान्याचा समावेश आहे.

11 कारखान्यांनी दिली “एफआरपी’
राज्यात 31 डिसेंबर 2018 अखेर गाळप झालेल्या आणि 15 जानेवारीपर्यंतच्या “एफआरपी’ अहवालानुसार, 185 साखर कारखाने सुरू होते. त्यापैकी 11 कारखान्यांनी “एफआरपी’ची 100 टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे, अशी माहिती आयुक्‍तालयाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)