पुणे – 21 मतदारसंघांचा कारभार महिलांच्या हाती

सखी मतदान केंद्रे म्हणून ओळखली जाणार : यंदा प्रथमच उपक्रम

पुणे – लोकसभा निवडणुकांसाठी शहरासह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एक याप्रमाणे मतदान केंद्रांचा संपूर्ण कारभार महिला पाहणार आहेत. त्यामुळे 21 महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे ही सखी मतदान केंद्रे म्हणून ओळखली जातील. जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर या तीन मतदारसंघात प्रत्येकी सहा, तर मावळ मतदारसंघात तीन सखी मतदान केंद्रे असतील. यंदा प्रथमच पुण्यात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही, तसेच मतदान केंद्रात कोणत्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्‍यक वापर टाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या सखी मतदान केंद्रात नियुक्त महिला त्यांच्या आवडीच्या कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकणार आहेत. “सखी मतदान केंद्र’ अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह तेथील स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत महिला शक्ती निर्णायक ठरणार आहे. 2014 च्या तुलनेमध्ये महिला मतदार हजार पुरुषांमागे 889 वरून 911 एवढ्या संख्येने वाढल्या आहेत. सखी मतदान केंद्रामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होईल. या केंद्रावर अधिकारी, कर्मचारी महिला असतील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून एका मतदान केंद्राची निवड करण्यात आली आहे. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्रे टाळून तहसील कार्यालय, पोलीस ठाण्यानजीकच्या केंद्रांची, तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्रांची या विशेष प्रयोगासाठी निवड करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली.

“महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे’
लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात “महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे’ निर्माण करण्यात येणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत आदेश दिले असून त्याची अंमलबजावणी राज्यात सर्वत्र करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये महिला पोलीस कर्मचारी नियुक्तीस असतील. तसेच निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सर्वच महिलांची नियुक्ती केली जाणार आहे. लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.