पुणे – हिंदू महासभेवर बंदी घाला; कॉंग्रेसची मागणी

पुणे – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी देशात सर्वत्र त्यांच्या शिकवणिचे स्मरण करून श्रध्दांजली वाहत असताना उत्तर प्रदेशातील अलिगड येथे हिंदू महासभेच्या कार्यकर्ते व नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर प्रतिकात्मरित्या गोळ्या झाडल्या आणि शौर्य दिवस साजरा केला. या कृत्याच्या निषेधार्थ शहर कॉंग्रेसच्या वतीने सोमवार पेठ येथील नरपतगीरी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी हिंदू महासभेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.

हिंदू महासभेच्या पदाधिकारी पूजा पांडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर प्रतिकात्मकरित्या गोळ्या झाडल्या व महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांचा जय जयकार केला. त्यामुळे हिंदू महासभेचा खरा चेहरा जनतेसमोर आला. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेबद्दल बोलतात परंतु बुधवारी झालेल्या या कृत्याच्या निषेधही त्यांनी केला नाही. “मुँह मे राम और बगल मे छुरी’ असे धोरण असल्याची टीका यावेळी कॉंगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, पक्षनेते अरविंद शिंदे, अविनाश बागवे, अजित दरेकर, चॉंदबी नदाफ, सुजाता शेट्टी, सदानंद शेट्टी, लता राजगुरू, नगरसेवक वैशाली मराठे, रफिक शेख, अनिल सोंडकर, हाजी नदाफ, माजी महापौर मुकारी अलगुडे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.