पुणे – स. प. महाविद्यालय स्वायत्त विद्यापीठासाठी प्रयत्नशील

पुणे – शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ अर्थात स. प. महाविद्यालयास स्वायत्त दर्जा मिळाला आहे. ही महाविद्यालयाच्या यशाची एक पायरी असून यापुढे स्वायत्त विद्यापीठाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, प्राचार्य डॉ. दिलीप सेठ यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

स. प. महाविद्यालयास स्वायत्त दर्जा मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रूसा) महाविद्यालयास 5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याविषयी माहिती देताना अॅड. जैन म्हणाले, केंद्र सरकारने स. प. महाविद्यालयास स्वायत्तता दिली. तसेच रूसाअंतर्गत 5 कोटींचा निधी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहे. फर्गसनप्रमाणे स. प. महाविद्यालयही कालांतराने विद्यापीठासाठी प्रयत्न करणार आहे. सरकारच्या निर्णयानुसार विद्यापीठाच्या निर्मितीसाठी व्हर्टिकल, क्‍लस्टर आणि स्वतंत्र महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करणे, असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. या तिन्ही प्रकारांबाबत सरकारची सविस्तर नियमावली अजून प्राप्त झालेली नाही. ही नियमावली मिळाली की, त्यानुसार स. प. महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करण्यात येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी अधिकाधिक कशा मिळतील, यासाठी अभ्यासक्रमांची रचना करण्यात येईल. विज्ञान शाखेशिवाय कला आणि वाणिज्य शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतील, यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात येईल. रूसाच्या निधीच्या माध्यमातून महाविद्यालयात संशोधन आणि विकासासाठी आवश्‍यक अशा पायाभूत सुविधा उभारण्यात येतील, असेही अॅड. जैन यांनी सांगितले.

लेडी रमाबाई सभागृहाचे नूतनीकरण
स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. सभागृहाच्या पुरातन बांधकामात बदल न करता हे नूतनीकरण होईल. नव्या सभागृहात आसन क्षमता वाढविण्यात येईल. याशिवाय वातानुकूलित यंत्रणा आणि ध्वनी यंत्रणा उभारण्यासोबत सभागृहाला फर्गसनच्या ऍम्पी थिएटरचा लूक देण्यात येईल. नूतनीकरणाचे काम येत्या 6 महिन्यांत पूर्ण होईल, असेही ऍड. जैन यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन
स. प. महाविद्यालयात येत्या रविवारी दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्योजकता व कौशल्य कक्षाचे डिजिटल पद्धतीने उद्‌घाटन होणार आहे. देशभरातील 25 शिक्षणसंस्थांना रूसाअंतर्गत अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या संस्थांमध्ये उद्योजकता कक्ष स्थापन करण्यासाठी 50 लाखांचा निधीदेखील देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी श्रीनगर येथून या कक्षाचे उद्‌घाटन करणार आहेत. स. प. महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमास महापौर मुक्‍ता टिळक उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)