पुणे – स्वारगेट आगार प्रमुखांना पालिकेची नोटीस

बसस्थानक परिसर तातडीने स्वच्छ करण्याचे आदेश

पुणे – स्वारगेट बस स्थानकातील अस्वच्छतेप्रकरणी स्वारगेट आगार प्रमुखांना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नोटीस बजाविली आहे. तसेच या परिसराची तातडीने स्वच्छता करून कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

स्वारगेट बसस्थानकाच्या सातारा रस्त्याकडील प्रवेशद्वाराबाजूला असलेल्या पत्र्याच्या सिमाभिंतीच्या सुमारे 50 मीटर भागाचा वापर अक्षरश: सार्वजनिक स्वच्छतागृहासारखा केला जात असून या ठिकाणाहून जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार राजरोसपणे सुरू असला, तरी पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून यावर केवळ पावडर टाकून हा प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भागात रात्रीच्या वेळी नागरिक रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात मुक्‍कामास असतात. तर, ज्या भागात हे घाणीचे साम्राज्य आहे, तेथे काही बसेस दिवसभर थांबलेल्या असतात. या गाड्यांचा आधार घेत रात्री तसेच दिवसाही या ठिकाणी भर वर्दळीच्या वेळी स्वच्छतागृहासारखा वापर केला जातो.

एसटीकडून या भागात सुरक्षा रक्षक नेमलेले असतानाही त्यांच्याकडून काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे या ठिकाणी असलेले पदपथ अक्षरश: मैला पाण्याने भरलेले आहे. त्यामुळे बाहेर गावाहून शहरात आलेल्या प्रवाशांना नाकाला रुमाल लावल्याशिवाय या भागातून जाणेच शक्‍य नसल्याची बाब दैनिक “प्रभात’ने समोर आणली होती. त्याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने आगार व्यवस्थापकांना नोटीस बजाविल्याचे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सह महापालिका आयुक्त अविनाश संकपाळ यांनी सांगितले.

सुरक्षा रक्षक करतात काय?
दरम्यान, स्वारगेट परिसरात रात्री रस्त्यावरच मुक्कामी असलेल्या नागरिकांकडून ही अस्वच्छता केली जात असल्याचे आगार प्रशासन सांगत आहे. तसेच दिवसा येथे सुरक्षा रक्षक असल्याचा दावा करण्यात आला. पण, मग ते करतात काय? असा प्रश्‍न या परिस्थितीमुळे उपस्थित होत आहे. मात्र, ही अस्वच्छता रात्री होत असल्याने त्या ठिकाणी 2 सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत. तसेच तातडीने याबाबत उपाययोजना न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही आगार व्यवस्थापकांना देण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)