पुणे – ‘सेट’ बदललेल्या अभ्यासक्रमानुसारच

पुणे – वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांसाठी घेण्यात येणारी 35वी सेट परीक्षा येत्या 23 जून रोजी होणार आहे. ही परीक्षा बदललेल्या अभ्यासक्रमानुसार होणार असून, राज्यातील एकूण 15 शहरांतील विविध महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाने निश्‍चित केलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे 32 विषयांसाठी होणार आहे.

महाराष्ट्र व गोव्याकरिता होणाऱ्या सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जातात. ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा येथे होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आगामी 35 व्या सेट परीक्षेस सुधारित अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सेट परीक्षेचे दोनच पेपर असतील. पेपर क्र. 1 जनरल पेपर असेल आणि पेपर क्र.2 संबंधित विषयाचा असेल. सहायक प्राध्यापक पदासाठीच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या परीक्षार्थ्यांनी अभ्यासक्रमातील बदलाबाबतची नोंद घ्यावी. अद्ययावत केलेले अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व परीक्षा केंद्र इत्यादींची सविस्तर माहिती सेट परीक्षा विभागाच्या http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती सेट परीक्षा समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी दिली.

या सेट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत दि. 1 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2019 अशी असणार आहे. ऑनलाइन अर्जातील चुका दुरुस्त करण्याची मुदत दि. 22 ते 28 फेब्रुवारी अशी आहे. त्यानंतर चुकांची दुरुस्ती करण्यासंदर्भातील अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. याबाबत काही शंका असल्यास सेट परीक्षा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विद्यापीठाने केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.