कर्मचारी पुन्हा उपसणार आंदोलनाचे हत्यार : अनास्थेमुळे वेतनाचा प्रश्नही चव्हाट्यावर
पुणे – मोबाइल सेवा पुरविणाऱ्या विविध कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सरकारच्या भारत दूरसंचार निगम (बीएसएनल) कंपनीला सध्या मोठा संघर्ष करावा लागत आहे. याचा फटका कर्मचारी वर्गाला बसत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी आता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी कामगार वर्गाकडून होत आहे. यासाठी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येणार आहे.
मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांची दरांमध्ये सध्या प्रचंड स्पर्धा सुरू आहे. त्यातच बीएसएनएल ही सरकारी कंपनी असल्याने अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागत आहे. कुठलेही निर्णय हे झटपट घेता येत नाही. आज मोबाइल सेवा कंपन्या पुरविणाऱ्या कंपन्यांची 4-जी सेवा सुरू आहे, पण बीएसएनएलने ही सेवा अजून सुरू केलेली नाही. त्यामुळे नेटवर्क जाम होणे, इंटरनेट सुविधा व्यवस्थित न मिळणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. बीएसएनएल मोबाइल सेवेचे ग्राहकही कमी झाले आहेत. लॅडलाइन सुविधा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
बीएसएनएलला जर या आर्थिक संकटातून बाहेर काढायचे असेल, तर दहा हजार कोटी रुपयांची गरज असणार आहे. त्यातील काही रक्कम ही केंद्र सरकारने द्यावी, तसेच उर्वरित रक्कम ही कर्ज काढून घेण्यात यावी. असा प्रस्ताव सध्या तयार करण्यात आला आहे, 4-जी सुविधा सुरू करावी, हे लक्षात घेऊन केंद्र शासनाने त्यात लक्ष घालावे अशी मागणी कामगार वर्गाकडून होत आहे.
आज देशभरात बीएसएनएलचे एक लाखाहून अधिक कर्मचारी आहेत. गेल्या अनेक वर्षात या कर्मचाऱ्याच्या वेतनाचा प्रश्न कधीच निर्माण झाला नव्हता, पण गेल्या महिन्यापासून वेतन सुद्धा वेळत मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. गेल्या महिन्यात पंधरा तारखेला वेतन जमा झाले होते. यातून निवडणुका संपेपर्यत तरी काही निर्णय होईल, याची शक्यता नाही
कर्मचारी म्हणतात…
“कंपनीबद्दल आम्हाला आदर आहे, पण स्पर्धेच्या काळानुसार जे बदल करायला पाहिजेत. आता लवकरच 5 जी पण येणार आहे. ती सेवा सुरू करण्यासाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर आतापासून उभे करण्याची गरज आहे. वेतनाचा प्रश्न अडकला आहे. अशा काही मागण्यासाठी आम्ही सर्व कर्मचारी 4 एप्रिल रोजी दिल्ली येथे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात देशभरातील सर्व बीएसएनएल कर्मचारी सहभागी होणार आहेत.
बीएसएनएल बंद पडणार नाही
सध्या बीएसएनएलची ढासळती सुविधा पाहता ही कंपनी काही दिवसात बंद पडणार, अशीच शक्यता ग्राहकांना वाटू लागली आहे पण कंपनी कधीच बंद पडणार नाही, कारण या कंपनीकडे जे इन्फ्रास्टक्चर आहे ते इतर कुठल्याही मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्याकडे नाही. देशातील गावागावांमध्ये बीएसएनएलची सेवा पोहचलेली आहे. देशातील अनेक ग्रामपंचायती आज इंटरनेटच्या माध्यामातून जोडण्यात आल्या आहेत. हे सर्व काम बीएसएनएलकडून होत आहे. यामुळेच कंपनी टिकून राहणार आहे, असा दावा कर्मचारी करत आहेत.