पुणे – शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळेत बदल

शिष्यवृत्ती व सैनिकी शाळांच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 24 फेब्रुवारीला घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

शिष्यवृत्तीची परीक्षा व अखिल भारतीय सैनिकी शाळांच्या प्रवेशाची पुनर्परीक्षा एकाच दिवशी व एकाच वेळी येत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. सातारा येथील सैनिकी शाळेच्या प्राचार्यांनी शिष्यवृत्तीची तारीख बदला किंवा वेळ बदलावी, असे पत्र परीक्षा परिषदेला गेल्या आठवड्यात दिले होते. त्यावर परीक्षा परिषदेने अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षा देता याव्यात यासाठी अखेर शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळेत बदल करण्यावर अंतिम शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा एकाच दिवशी व एकाच वेळी होणार आहे. जुन्या वेळापत्रकानुसार पेपर 1 साठी सकाळी 11 ते दुपारी 12.30 तर, पेपर 2 साठी दुपारी 1.30 ते 3 अशी वेळ ठरविण्यात आली होती. आता बदलण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार पेपर 1 हा दुपारी 1 ते 2.30 तर, पेपर 2 हा दुपारी 3.30 ते 5 यावेळेत होणार आहे.

इयत्ता पाचवीसाठी 5 लाख 12 हजार 477 तर, इयत्ता आठवीसाठी 3 लाख 52 हजार 968 असे एकूण 8 लाख 65 हजार 445 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसणार आहेत. एकूण 5 हजार 857 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा 320 केंद्रांची संख्या यंदा कमी झालेली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा व अखिल भारतीय सैनिकी शाळांच्या प्रवेश पुनर्परीक्षा या दोन्ही परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या त्या ठिकाणच्या केंद्रांवरच परीक्षा घेण्याची व्यवस्था परीक्षा परिषदेकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रासह परीक्षेला उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. परीक्षेसाठी बदललेल्या वेळेची माहिती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.