पुणे – शिक्षणापासून दुरावलेली मुले प्रवाहात

‘न्यास’च्या “ताई-दादा’च्या प्रयत्नांना यश : “फिरती शाळा’ उपक्रम

– कल्याणी फडके

पुणे – एकमेकांना लागून असणारी घरे.. परिसरातील अस्वच्छता.. वस्तीमध्ये फिरत असणारी लहान मुले.. एक लहानशी खोली.. शैक्षणिक साहित्य.. छोटेसे मात्र कपाटभर पुस्तकांचे ग्रंथालय.. तिथे शिकण्यासाठी आलेली मुले आणि त्यांना शिकवणारे “तरूण ताई-दादा’ असे चित्र कर्वेनगरजवळ असणाऱ्या संभानगर वस्तीमध्ये पाहायला मिळते.

महाराष्ट्र मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या पाठीमागे असणाऱ्या सुमारे 200 घरांच्या झोपडपट्टी परिसरामध्ये विदारक परिस्थितीचे सुधारित चित्र पाहायला मिळते. या वस्तीची परिस्थिती सुधारण्यासाठी ते निमित्त ठरत आहे. “न्यास’चे रोहित यलिगार, अनघ ढगे, राणी डोईफोडे, अजिंक्‍य अष्टीकर, श्रद्धा पतंगे, हर्षदा ढुमके, श्रद्धा कदम, वैष्णवी जोशी, सुमीत गोनेकर, आरोही माचीकर, पूजा पन्हाळे, सुषमा कुंभार, अंकिता चव्हाण यासह आदी 20 ते 25 वयोगटांतील हा “युथ ग्रुप’ या वस्तीवर “फिरती शाळा’ हा अनोखा उपक्रम राबवत आहे. विविध महाविद्यालयांमध्ये शिकणारे आणि नोकरदार “तरूण-तरूणी’ आठवड्यातील शनिवार आणि रविवारी या मुलांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाचा दै. “प्रभात’ने घेतलेला खास आढावा.

फिरती शाळा सुरू करण्याच्या कल्पनेबाबत रोहित यलिगार सांगतो, “आम्ही मित्र-मैत्रिणी क्‍लासरूममध्ये विविध गोष्टींवर चर्चा करायचो. चर्चेनंतर आपण केवळ चर्चा न करता काहीतरी काम केले पाहिजे, असे वाटायचे. थोडा विचार केल्यानंतर तात्पुरते नाही तर कायमस्वरुपी काम करणे गरजेचे हे लक्षात आले. कर्वेनगरमधील अभ्यास करताना या वस्तीतील अनेक प्रश्‍न समोर होते. मात्र, या भागातील शिक्षणाचा प्रश्‍न अधिक गंभीर आहे, त्यामुळे मुलांना शिक्षण देण्याचा विचार केला.’

पारधी वस्तीच्या मुलांसाठी काम करणारी राणी डोईफोडे सांगते, “मी या उपक्रमात गेल्या दीड वर्षांपासून सहभागी आहे. कोकणी वस्तीवर जाताना पारधी वस्तीतील काही मुलांना वस्तीवर फिरताना पाहायचे. त्यांना अधिकाधिक मदत करून मुख्य प्रवाहात कसे आणायचे असा विचार करत असताना, फिरती शाळेचा एक वर्ग तिकडे देखील सुरू करावा, असे वाटले. प्रयत्न करून पाहावा या उद्देशाने आम्ही याची सुरुवात केली. परंतु, पालक आणि स्थानिक मुले आम्हाला काहीच प्रतिसाद देत नव्हते, शाळेत येणाऱ्या मुलांना त्रास देत उधळून लावण्याचा प्रयत्न करायचे. त्यानंतर बंद वर्गात आम्ही मुलांना शिकवायला सुरुवात केली. त्यादरम्यान आम्ही 9 ते 10 मुलांना जवळच्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन दिला होता. त्यापैकी दोन मुले त्या शाळेत नियमित जात आहेत. सध्या काही मुले स्वत:हून “आम्हाला शाळेत प्रवेश घेऊन द्या’ असे सांगतात. हेच आमच्या कामाचे फळ आहे, असे मला वाटते.’

“मला आई-वडिलांबरोबर काम करायला जावे लागते, म्हणून मी शाळेत जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या भावाला शाळेत प्रवेश करून द्या’, असे वस्तीतील एका मुलीने आम्हाला सांगितले. त्या मुलांचे असे सांगणे म्हणजे कामाची पावती आहे असे वाटते.
– राणी डोईफोडे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.