पुणे – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध

राज्य शासनाने मंजूरी : फारसा समाधानकारक नसल्याने संघटनांमध्ये नाराजी


अर्धवेळ ग्रंथपाल व अधीक्षक पदे रद्द होणार


प्रयोगशाळा सहायक व पूर्णवेळ ग्रंथपालांची पदे कमी होणार

पुणे – राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशत: व पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे निश्‍चित करण्यासाठीचा सुधारित आकृतीबंध लागू करण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. दरम्यान, तो फारसा समाधानकारक नसल्याने संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

शासनाकडून आकृतीबंधाला मान्यता मिळत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया बंद आहे. आकृतीबंधाला मान्यता मिळावी यासाठी विविध कर्मचारी संघटनांकडून अनेकदा आंदोलने करण्यात आली आहेत. वेळोवेळी शासनाकडून आकृतीबंधात सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यालाही स्थगिती देण्यात आली होती. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे निश्‍चित करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. त्यात लोकप्रतिनिधी व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला होता. या समितीने 31 जुलै 2015 रोजी अहवाल सादर केला होता. त्यानंतर आयुक्त समितीच्या शिफारशी व यापूर्वी गठीत करण्यात आलेल्या चिपळूणकर समिती, गोगटे समिती व तत्कालीन उच्चस्तरीय समितीने ठरवून दिलेली पदे यांचा विचार करून सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सुधारित आकृतीबंध लागू केला आहे. याबाबतचा शासन निर्णयही उपसचिव चारुशीला चौधरी यांनी जारी केला आहे. सुधारित आकृतीबंधात विद्यार्थी संख्येनुसार कनिष्ठ लिपिकांची 17 हजार 695, वरिष्ठ लिपिकांची 4 हजार 912, मुख्य लिपिकांची 926 पदे मंजूर करण्यात आली आहेत. पूर्णवेळ ग्रंथपालाची 2 हजार 228 पदे मंजूर झाली आहेत.

अर्धवेळ ग्रंथपाल पदावर सध्या 1 हजार 600 कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ही पदे व्यपगत करण्यात येणार आहेत. या पदांची नव्याने भरती करण्यात येणार नाही. याप्रमाणेच अधिक्षक पदावर कार्यरत असलेले 19 कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचीही पदे नव्याने भरण्यात येणार नाहीत, असे आकृतीबंधात नमूद केले आहे.

प्रयोगशाळा सहायकासाठी 201 ते 700 विद्यार्थी संख्येसाठी 4 हजार 48 व 701 ते 1500 विद्यार्थ्यांसाठी 610 तर 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्येसाठी 27 याप्रमाणे इयत्ता 9 वी 10 वीसाठी ही पदे मंजूर करण्यात आली आहेत. उच्च माध्यमिकमधील विज्ञान शाखेतील भौतिक व रसायनशास्त्रासाठी 1 हजार 20 व जीवशास्त्रासाठी 1 हजार 20 प्रयोगशाळा सहायकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत.

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदांसदर्भातील आकृतीबंधाबाबात स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. अतिरिक्त होणारी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे संस्थेचे कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंतच कार्यरत राहणार आहेत. तसेच त्यांच्या सेवा इतर अनुदानित संस्थांमध्ये तात्पुरत्या प्रत्यावर्तित करण्यात येणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर अतिरिक्त ठरलेली पदे आपोआप व्यपगत होणार आहेत, असेही शासनाने आदेशात नमूद केले आहे.

आकृतीबंधात शिपाई पदांचा समावेश नाही
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करताना शासनाने नेमलेल्या समितीनुसार कार्यवाहीच करण्यात आलेली नाही. समितीचा अहवाल बाजूला ठेवून पदंसख्येत वाढ करण्याऐवजी कपात करण्यात आली आहे. प्रयोगशाळा सहायक, ग्रंथपाल यांची पदे कमी करण्यात आली आहेत. शिपाई पदांची 50 हजार पदे रिक्त असतानाही त्याचा आकृतीबंधात समावेश करण्यात आलेला नाही. हे अन्यायकारक आहे. नवीन पदे भरण्यासाठी फारचा वाव शिल्लक राहणार नाही. त्यामुळे हा सुधारित आकृतीबंध फारसा समाधानकारक व फायदेशीर नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटना महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष संभाजी शिरसाट व महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्‍क परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रसन्न कोतुळकर यांनी स्पष्ट सांगितले आहे. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये या आकृतीबंधामुळे नाराजीचा सूर निर्माण होण्याची चिन्हे अधिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)