पुणे – शालेय पोषण आहाराचे काम ‘अक्षयपात्र’ला नाहीच

महापालिकेने मागविली स्वारस्य अभिव्यक्ती

पुणे – महापालिका शाळेमधील मुलांना यंदाही केंद्रीय स्वयंपाकगृहाद्वारे शालेय पोषण आहार पुरविला जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने स्वारस्य अभिव्यक्ती (एक्‍सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागविले आहेत.

शासनाच्या मार्च महिन्यातील मार्गदर्शक सूचनांनुसार हे अर्ज मागविण्यात आले असून या कामासाठी इच्छूक संस्थाना 22 मे पर्यत अर्ज दाखल करता येणार आहेत. दरम्यान, या कामासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातूनच अक्षयपात्र या संस्थेस पालिकेच्या शाळातील सुमारे 25 हजार मुलांना आहार दिला जाणार होता. मात्र, हे काम आता या संस्थेस दिले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका शाळेतील मुलांना या पूर्वी बचतगटांच्या माध्यमातून शालेय पोषण आहार दिला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षापासून शासनाने तो केंद्रीय स्वयंपाकगृहाद्वारे देण्याचे बंधनकारक केले आहे. तसेच शाळा सुरू होण्यापूर्वी हे काम देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्या नुसार पालिकेने स्वारस्य अभिव्यक्ती जाहीर केले आहेत. त्याच्या नियम व अटी महापालिकेच्या संकेतस्थळावर असून त्यानुसारच पात्र संस्थेस हे काम दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

तांत्रिक अडचणींमुळे करार कठीण
अक्षयपात्र या संस्थेकडून महापालिका शाळांमधील 25 हजार मुलांना सीएसआर योजनेंतर्गत पोषण आहार दिला जातो. याचे काम अक्षयपात्र संस्थेस देण्यात येणार आहे. त्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून, हडपसर, वानवडी, कोंढवा- येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये ही योजना राबविली जाणार असून त्यास स्थायी समितीनेही मान्यता दिली होती. त्यानंतर महापालिका आणि या संस्थेस करारनामा करण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती. मात्र, या संस्थेच्या अटीनुसार ते जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतच आहार देतात. तसेच ही संस्था एका वर्षासाठी करार करण्यास तयार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची या कराराने अडचण होण्याची शक्‍यता होती. त्यातच आता शासनाने संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय स्वयंपाकगृहाद्वारे शालेय पोषण आहार पुरविण्याचे आदेश दिल्याने या संस्थेस काम देणे शक्‍य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.