पुणे: शाब्दिक वादाची 100 कोटींची उड्डाणे

भाजयुमो, रिपाइंचे महापौरांना पत्र
भिमाले-शिंदे या विषयावर कॉंग्रेस, रिपाइं आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांनी महापौरांना पत्र दिले आहे. सातत्याने आंदोलन करून सभेचे कामकाज बंद पाडणे, तसेच भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, सभागृहनेते यांची बदनामी करण्याचे काम शिंदे यांनी सुरू केले आहे. यामुळे शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजयुमो आणि रिपाइंने दिला आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी महापौरांची भेट घेऊन पत्र दिले आहे.

अरविंद शिंदे यांच्यावरही दावा
महापालिका मुख्यसभेतील शाब्दिक वाद प्रकरण

पुणे – गेल्या आठवड्यात 21 मे रोजी महापालिका मुख्यसभेत कॉंग्रेस गटनेते आणि सभागृहनेते यांच्यात झालेल्या शाब्दिक वादाने आता कोटीची उड्डाणे गाठली असून, शिंदेंपाठोपाठ भिमाले यांनीही शिंदे यांच्यावर तब्बल 100 कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा मंगळवारी दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेतील अतिक्रमण निरीक्षकाला मारहाण केल्याचा विषय महापालिका मुख्यसभेत चर्चिला गेला. मारहाण करणारा कार्यकर्ता हा भिमाले यांचा होता अशी चर्चा होती. हा विषय शिंदे यांनी महापालिका मुख्यसभेत काढला. अधिकाऱ्यांवर हल्ले झाले तर त्यांचे मनोधैर्य खचेल, असे शिंदे यांचे म्हणणे होते. या विषयवरून भिमाले आणि शिंदे यांचा सभागृहातच वादाचा फड रंगला. भिमाले यांनी शिंदेचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

भिमाले यांनी बदनामीकारक वक्तव्य केल्याचा दावा करून शिंदे यांनी भिमाले यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर भिमाले यांनीही शिंदे यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर शिंदे यांनी थेट न्यायालयातच भिमाले यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. त्यामुळे पुन्हा खवळून जाऊन भिमाले यांनी शिंदे यांच्याविरोधात थेट 100 कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे.

या विषयात मध्यस्थी करण्यात येईल, असे महापौरांनी सोमवारी सांगितले होते. मात्र, तसे काहीच झाले नसून दोन्ही नेते इरेला पेटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आम्ही उत्तराला उत्तर देणार – भिमाले
आम्ही बदनामीला न घाबरता उत्तराला उत्तर देणारच. त्याचाच भाग म्हणून आम्ही कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांना नोटीशीनेच उत्तर दिले आहे, अशा भाषेत सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी शिंदे यांना आव्हानच दिले आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत भिमाले यांनी याविषयी बाजू मांडली.शिंदे आणि भिमाले यांच्यातील वाद अधिकच चिघळला असून, भिमाले यांनी शिंदे यांच्यावर 100 कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्याची नोटीस पाठवली आहे. शिंदे यांनी 48 तासांत माफी मागावी, अन्यथा खटल्याला सामोरे जावे. तसेच पुढील काळात अशाप्रकारची बदनामी करणार नाही याची हमीही भिमाले यांनी नोटीशीद्वारे मागितली आहे.

मुख्यसभेत शिंदे यांनीही आपल्याबाबत अपमानस्पद विधाने केली आहेत. तसेच फेसबुकवरही महापालिका पदाधिकाऱ्यांचा आक्षेपार्ह शब्दांत उल्लेख केला आहे, असेही या नोटीशीत नमूद केले आहे. शिंदे हे सातत्याने शहराच्या विकासाच्या विषयांना गेल्या वर्षभरापासून विरोध करत आले आहेत. त्यांच्याकडे सत्ता नसल्याचा त्यांना त्रास होत आहे म्हणून ते अशाप्रकारे विरोध करून प्रत्येक गोष्टीत संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेत असतानाही त्यांनी सभागृहात भाषणातून अधिकाऱ्यांना दम देऊन कामे करून घेतली आहेत, असा आरोपही भिमाले यांनी केला.

…अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही – कॉंग्रेस
अरविंद शिंदे यांच्यावर केले गेलेले आरोप चुकीचे असून, अशाप्रकारचे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला आहे. बागवे, माजी आमदार मोहन जोशी आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंगळवारी महापौरांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले. आपल्या महापौर पदाच्या कार्यकाळात अशाप्रकारच्या घटना घडणे दुर्दैवी आहे. सभागृहावर अंकुश असणे गरजेचे आहे. अशाप्रकारचे वैयक्तिक आरोप करू देऊ नयेत, असे कॉंग्रेसने पत्रात नमूद केले आहे. एवढेच नव्हे, तर महापालिका इमारतीत, गेल्या काही महिन्यांपासून मोठे गट करून महापालिकेतील इतर कार्यालयांमध्ये, अधिकाऱ्यांच्या दालनात जाणे, त्यांच्यावर दबाव आणणे असे गंभीर प्रकार घडत आहेत. महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर देखील असेच दृष्य पहायला मिळत आहे. यामुळे महापालिकेत मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही; तर याची गंभीर दखल घ्यावी, असेही या पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)