पुणे शहरात यंदा पावसाळ्यातही रस्ते खोदाई?

पुणे – पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी तसेच पावसाळ्यात रस्ते खोदाई केल्यास मोठ्या प्रमाणात खड्डे पडून नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पालिकेकडून गेल्या काही वर्षांत 30 एप्रिल ते 1 ऑक्‍टोबर या कालावधीत रस्ते खोदाईची कामे बंद ठेवली जातात. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात पालिकेची समान पाणी योजना अपवाद ठरणार असून पावसाळ्यातही या योजनेसाठी जलवाहिनी टाकण्यास मुभा दिली जाण्याची शक्‍यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. योजनेचे काम वेळेत पूर्ण व्हावे या उद्देशाने हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महापालिकेकडून पुणेकरांना चोवीस तास समान पाणी देण्यासाठी सुमारे 2,500 कोटींची योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शहरात तब्बल 1,600 किलो मीटरची नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यासाठी तेवढीच रस्ते खोदाई केली जाणार आहे; तर पहिल्या टप्प्यात हे जलवाहिनी टाकण्याचे काम करणाऱ्या कंपनीने 168 किलो मीटरच्या खोदाईसाठी मागणी केली आहे. त्यास आयुक्तांनी मान्यता दिली असल्याने हे खोदाईचे काम सुरू झालेले असून आतापर्यंत गेल्या दीड महिन्यांत केवळ 16 किलो मीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यात आता पालिकेच्या खोदाईच्या नियमानुसार केवळ 1 महिनाच शिल्लक असल्याने एवढी मोठी खोदाई होणार नाही तसेच पावसाळ्यात पुन्हा पाच महिने काम थांबल्यास या योजनेच्या खर्चावर तसेच वेळा पत्रकावर परिणाम होणार आहे. त्यामुळे अपवादात्मक बाब म्हणून या कंपनीस पावसाळ्यातही खोदाईस मान्यता देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या निर्णयाकडे लक्ष…
महापालिकेकडून दरवर्षी 30 एप्रिलपासूनच शहरातील मोबाइल कंपन्या, एमएनजीएल तसेच महावितरणची खोदाई बंद केली जाते. पावसाळ्यापूर्वी शहरातील खोदाई करण्यात आलेल्या या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी संपूर्ण मे महिना आवश्‍यक असल्याने हा निर्णय घेतला जातो. मात्र, मागील वर्षी महापालिकेच्या या निर्णयाविरोधात “एमएनजीएल’ या कंपनीने राज्य शासनाकडून 31 मेपर्यंत खोदाईची मान्यता मिळविली होती. त्यामुळे इतर कंपन्यांनाही महापालिकेने नाईलाजास्तव खोदाईस मान्यता दिली होती. मात्र, आता समान पाणी योजनेची खोदाई होणार असल्याने महापालिका इतर कंपन्यांच्या खोदाईबाबत काय निर्णय घेणार यावर पावसाळ्यातील रस्त्याचे चित्र अवलंबून असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.