पुणे विद्यापीठ देशात सहाव्या क्रमांकावर!

पारंपारिक विद्यापीठांमध्ये पहिले स्थान
जगातील पहिल्या 501 ते 600 विद्यापीठांच्या गटात समावेश

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 28 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने “द टाईम्स हायर एज्युकेशन’ (टीएचई) रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये देशात संयुक्तरीत्या सहावा क्रमांक पटकावला आहे, तर पारंपारिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे वरच्या पाच संस्थांमध्ये बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, तीन आयआयटी आणि मैसूरच्या जेएसएस अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च या वैद्यकीय विद्यापीठाचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“टीएचई’ने आज जागतिक विद्यापीठांची क्रमवारी जाहीर केली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जगातील पहिल्या 501 ते 600 विद्यापीठांच्या गटात विद्यापीठाने स्थान मिळवले आहे. गेली तीन वर्षे विद्यापीठाचा समावेश पहिल्या 601 ते 800 विद्यापीठांच्या गटात होता. या तुलनेत विद्यापीठाने यंदा तब्बल 200 गुणांची झेप घेतली आहे.

“टीएचई’ रॅंकिंगद्वारे जगातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या कामगिरीवर आधारित गुणांकन दिले जाते. त्यात अध्यापन, संशोधन, ज्ञानप्रसार आणि आंतरराष्ट्रीय भान या चार निकषांवर विशेष भर दिला जातो. याशिवाय इतर 13 महत्त्वाच्या निकषांच्या आधारे गुणांकन दिले जाते. त्यानुसार पहिल्या एक हजार विद्यापीठांची नावे जाहीर केली जातात. या रॅंकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 2016 सालापासून सहभागी होत आहे. गेली तीन वर्षे विद्यापीठाची कामगिरी सुधारत होती. आता पहिल्या 501 ते 600 विद्यापीठांच्या गटात समावेश झाला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे “नॅशनल इन्स्टिट्यूशलन रॅंकिंग फ्रेमवर्क’ने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीत विद्यापीठाचा नववा क्रमांक आला होता. आता विद्यापीठाने आणखी प्रगती केल्याचे “टाइम्स हायर एज्युकेशन’च्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याच मूल्यांकनात देशातील पारंपारिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2016 मध्ये तिसरा, तर 2017 मध्ये दुसरा क्रमांक आला होता. 2019 मध्ये विद्यापीठाने संयुक्त पहिला क्रमांक पटकावला होता. आता पारंपारिक विद्यापीठांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे.


“जागतिक क्रमवारीत एक महत्त्वाचा टप्पा ओलांडणे हे आव्हान असते. त्यापैकी एक आव्हान आम्ही पार केले आहे. आता पुढचा टप्पा पहिल्या 500 विद्यापीठांच्या गटात पोहोचण्याचा असेल. आम्ही योग्य दिशेने काम करत आहोत, हे या गुणांकनावरून स्पष्ट झाले आहे. यामुळे आणखी जबाबदारीही वाढली आहे.’
डॉ. नितीन करमळकर : कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)