पुणे विद्यापीठाची गुणांकनात मोठी झेप

पुणे विद्यापीठ संपूर्ण आशिया खंडात 109 व्या स्थानावर

मागील वर्षीच्या 188 व्या स्थानावरून मोठी झेप
प्रभात वृत्तसेवा
पुणे  – “टाईम्स हायर एज्युकेशन रॅंकिंग’च्या आशिया खंडातील विद्यापीठांची गुणांकने जाहीर झाली असून, त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संपूर्ण आशिया खंडात 109 वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी विद्यापीठ याच गुणांकनात 188 व्या स्थानावर होते. तेथून ही झेप घेतली आहे. याच गुणांकनानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सामाईकपणे सहाव्या स्थानावर आहे.

विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांत गुणवत्तेचे विविध टप्पे पार केले आहेत. त्यामुळे “टाईम्स हायर एज्युकेशन’च्या जागतिक गुणांकनात विद्यापीठ पहिल्या 501 ते 600 या गटात समाविष्ट झाले आहे. त्याआधी तीन वर्षे ते 600 ते 800 या गटात समाविष्ट होते. याशिवाय नव्याने विकसित होत देशांमध्ये (एमर्जिंग इकॉनॉमिज) विद्यापीठाने 93 वा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आशिया खंडात गेल्या वर्षीच्या 188 व्या स्थानावरून या वर्षी 109 व्या स्थानावर पोहोचले आहे.

या गुणांकनानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने भारतातील विद्यापीठांमध्ये संयुक्तपणे सहावा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (बंगळुरू), दुसऱ्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (इंदूर), तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (मुंबई), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (रूरकी) आणि जेएसएस अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च (मैसूर) या संस्था आहेत. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (दिल्ली), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (कानपूर), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (खरगपूर) या संस्थांसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एकूण मिळून 36.4 गुण प्राप्त केले आहेत. त्यातही गेल्या वेळच्या तुलनेत संशोधन व अध्यापन या मुद्द्यांवर अधिक सरस कामगिरी केली आहे. या गुणांकनात आशिया खंडातील जपान, चीन, सिंगापूर, भारत, हॉंगकॉंग, तैवान, दक्षिण कोरिया, पूर्व आशिया, मलेशिया, फिलिपिन्स, टर्की, इस्रायल, जॉर्डन या प्रमुख देशांसह पाकिस्तान, इराण, मकाऊ, कतार, लेबनान, युएई, साउदी अरेबिया या देशांमधील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ही मोठी झेप आहे. विद्यापीठाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे या गुणांकनावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे “नॅशनल इन्स्टिट्यूट रॅंकिंग फ्रेमवर्क’ (एन.आय.आर.एफ.) या गुणांकनात पुढे असलेल्या विद्यापीठांना व उच्चशिक्षण संस्थांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या गुणांकनात मागे टाकले आहे. ही कामगिरी विद्यापीठाच्या सर्वच भागधारकांचा हुरूप वाढवणारी आहे.

– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.