पुणे -‘वास्तू नाही तर तीर्थस्थान’

पुणे – “पुणे तिथे काय उणे’ म्हणतात ते खरे ठरते ते पुण्याच्या संपन्न वारशामुळे. वाडे, मंदिरे, टेकड्या, ऐतिहासिक वास्तू आदी ठिकाणांमध्ये क्रांतिकारकांचा वावर असणारी ठिकाणे अभिमानास्पद इतिहासामध्ये भर घालतात.

फर्गसन महाविद्यालयामधील वसतिगृह क्रमांक 1 आणि खोली क्रमांक 17 अशी ओळख असणारे हे ठिकाण प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटेल असेच आहे. या खोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर स्फूरण चढते, ते वेगळेच. अनेक सावरकरप्रेमी या खोलीचे “वास्तू नाही तर तीर्थस्थान’ असे वर्णन करतात. हे वर्णन आहे, फर्गसन महाविद्यालयातील “सावरकर खोली’चे.

फर्गसन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना 1902 ते 1905 या कालावधीमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या वसतिगृहामध्ये राहात होते. या खोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर सावरकरांच्या पुतळ्याकडे सर्वप्रथम लक्ष जाते. त्यानंतर शेजारच्या भींतीवर सावरकरांचा इतिहास सांगणारे भीत्तीचित्र पाहायला मिळते. त्याचबरोबर खोलीमध्ये लोकमान्य टिळकांचा फोटो ठेवण्यात आला आहे. या खोलीमध्ये सावरकरांचे दिवाण (खाट), खुर्ची, नागपूर आणि पुणे विद्यापीठातील त्यांचे पदवीचे कोट, त्यांची सही, फोटो, पुस्तके आणि सावरकरांच्या कार्याचा इतिहास सांगणारी चित्रे रेखाटण्यात आली आहेत.

कवितांचे लेखन, वीररसाने भारावलेल्या काव्यांचे लेखन सावरकरांनी केले. “सिंहागडाचा पोवाडा’, “बाजीप्रभूंच्या इतिहासाचे वर्णन’ करणारे पोवाड्यांसह “जयोस्तुते’ या काव्याचे लेखन देखील या खोलीमध्ये केल्याचे समजते. सावरकरांनी केलेल्या विविध आंदोलनांची सुरुवात महाविद्यालयातील काळामध्ये झाली. डेक्‍कन परिसरामध्ये केलेली विदेशी कपड्यांची होळीचे नियोजन त्यांनी याच वसतिगृहामध्ये केले. सावरकरांची ही खोली सर्वांना पाहता यावी, या उद्देशाने सध्या ही खोली केवळ सावरकर जयंतीच्या दिवशी म्हणजेच 28 मे आणि सावरकर पुण्यतिथी म्हणजेच 26 फेब्रुवारी या दोन दिवशी पुणेकरांसाठी खुली ठेवण्यात येते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.