राजकीय धुरळा ! कोण गाजवणार पुणे लोकसभेचे रणांगण ?

पुणे: एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणूक येताच घोडेबाजार, उमेदवारांची पळवापळवी, फोडाफोडी, आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उठायला सुरुवात होते. तसे वातावरण सर्वसामान्यांना मागील पाच राज्यांच्या निवडणुकीपासून पहायला मिळत आहे.

माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर मात्र कॉंग्रेस पक्षाकडे लोकसभेसाठी तसा चेहराच उरला नाही. नाही म्हणायला, कॉंग्रेसकडे जुने कार्यकर्ते नाहीत असे नाही. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कॉंग्रेससाठी तिकीट मिळण्याच्या आशेवर खर्ची केले, मात्र पक्षाशी गद्दारी केली नाही, असे अनेक निष्ठावंत आजही कॉंग्रेसकडे आहेत. मात्र कार्यकर्त्यांची जी फळी उभारण्याचे काम सुरेश कलमाडी यांनी केले होते. तशी फळी उभारणे, किंवा आहे ती साखळी घट्ट करण्याचे काम त्यानंतर कोणालाच जमले नाही. संघटनकौशल्याच्या अभावी मागील निवडणुकीत कॉंग्रेसला उमेदवार चांगला देउनही हार पत्करावी लागली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर खा. अनिल शिरोळे यांना साडेपाच लाखावर मते मिळाली होती. एकूण मतांच्या पैकी जवळपास साठ टक्के मते त्यांना मिळाली होती. तुलनेने कॉंग्रेसचे उमेदवार विश्‍वजीत कदम यांना त्यांच्यापेक्षा जवळपास निम्मे मतदान झाले होते. एकूण मतदानाच्या 25 टक्के मते कॉंग्रेसला पडली होती. तिसऱ्या क्रमांकाची मते मनसेचे दीपक पायगुडे यांना पडली होती. त्यांनाही एकूण मतदानापैकी जवळपास दहा टक्के मते मिळाली होती. त्याच्या आधीच्या निवडणुकीत म्हणजे 2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुरेश कलमाडी हे अनिल शिरोळे यांच्यापेक्षा केवळ 25 हजार मतांनी निवडून आले होते. या सर्व आकडेवारीचा अभ्यास केला तर असे दिसून येते की, पुण्यामध्ये कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या मतांमध्ये फारसा फरक नव्हताच. मात्र गेल्या निवडणुकीत मोदी करिश्‍मा झाल्याने अनिल शिरोळे हे विक्रमी मतांनी निवडून आले. आताची परिस्थिती वेगळी आहे. आता मोदी करिश्‍मा संपला आहे. हे पाच राज्यांच्या निवडणुकांतून सिद्ध झालेले आहे. राहुल गांधीही पक्षीय राजकारणामध्ये हळुहळू का होईना प्रगतीपथावर आहेत. उत्तरेत युवकांची एक मोट बांधण्यात ते यशस्वी होताना दिसतात. पाच पैकी तीन राज्यांच्या निवडणुकीत मिळालेले यश आणि प्रियांका गांधी यांचे सक्रीय राजकारणात झालेले आगमन या दोन गोष्टींमुळे कॉंग्रेसमध्ये उत्साह संचारला असला तरीही प्रत्यक्ष पुण्यातील परिस्थिती मात्र कॉंग्रेससाठी पुरक नाही.

पुणे मतदार संघामध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅंन्टोन्मेंट, कसबा पेठ या सर्वच ठिकाणी सध्या भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे. मागच्या निवडणुकीत यापैकी काही ठिकाणी म्हणजे वडगाव शेरी, शिवाजीनगर, कॅंन्टोन्मेंट या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले नव्हते. तो भाग कॉंग्रेस आणि त्यांच्या आघाडी पक्षाकडेच होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेने सगळ्याच पक्षांचे मैदान साफ करून टाकले. आता मात्र ती परिस्थिती राहिली नाही. कॉंग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे.

निवडणुकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती झाल्याने पुण्याची जागा कॉंग्रेसकडे राहणार हे स्पष्ट झाले आहे. मोहन जोशी, गाडगीळ, अभय छाजेड आदींची नावेही चर्चेत आहेत. इकडे भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे विद्यमान पालक मंत्री गिरीश बापट हे देखील केंद्रात जाण्यासाठी उत्सुक आहेत. एकीकडे अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि भारतीय जनता पार्टीला नंतर बाहेरून पाठींबा देणारे रीयल इस्टेटमॅन संजय काकडे हे देखील भारतीय जनता पार्टीने तिकीट देण्याची मनिषा बाळगून आहेत. त्यांना तिकीट नाकारले गेले, तर ते कोणत्याही पार्टीत जाउन तिकीट घेउ शकतात. हे त्यांच्या मागच्या हालचालींवरून स्पष्ट झाले आहे. असे झाले तर पुन्हा ही जर तरची समीकरणे उदयास येतील.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना, भाजपा यांच्यामध्ये युती झाल्याने खरी लढत कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोनच पक्षात लोकसभेच्या बाबतीत तरी पहायला मिळेल. मनसे अजून कशातच नाही. तर इतरही पक्ष आपले उमेदवार देतील. त्यामध्ये मतांची आकडेवारी जरी भाजपाकडे झुकताना दिसत असली तरीही प्रत्यक्षात केंद्राच्या निर्णयांवर जनता जनार्दन नाराज आहेच. त्याचे पडसाद येत्या लोकसभा निवडणुकीवर उमटल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचा फायदा कॉंग्रेसला घेता येईल. मात्र कॉंग्रेसकडून या वेळी कोणता चेहरा येतो, त्यावरच सगळी लढाई अवलंबून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.