पुणे लीग कबड्डी स्पर्धा : वेगवान पुणे संघाला दुहेरी मुकुट 

पुरुष विभागातही विजेतेपदाचा मान 
पुणे – वेगवान पुणे संघाने पुरुष विभागात विजेतेपद पटकावताना येथे पार पडलेल्या पुणे लीग कबड्डी स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन केला. वेगवान पुणे संघाने त्याआधी लयभारी पिंपरी चिंचवड संघाचा एक गुणाने पराभव करताना महिलांचे विजेतेपद पटकावले होते. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने राष्ट्रवादी कॉंग्रेस, प्रभाग क्रमांक 9, बाणेर बालेवाडी पाषाण यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलातील स्वर्गीय अशोकराव कोंढरे क्रीडा नगरीमध्ये पार परडलेल्या या स्पर्धेतील पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात वेगवान पुणे संघाने शिवनेरी जुन्नर या संघावर 40-21 अशी दणदणीत मात करीत विजेतेपदाची निश्‍चिती केली. मध्यंतराला वेगवान पुणे संघाकडे 16-7 अशी आघाडी होती. वेगवान पुणे संघाच्या विवेक घुले व गणेश कांबळे यांनी सुरुवातीपासूनच अत्यंत आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वेगवान पुणे संघाने मध्यंतरापूर्वीच सामन्याच्या आठव्या मिनिटालाच शिवनेरी जुन्नर संघावर पहिला लोण लावत 10 -2 अशी आघाडी घेतली. तर मध्यंतरानंतर सामना संपण्यास 14 मिनिटे बाकी असताना दुसरा लाणन लावत 31-7 अशी निर्णायक आघाडी घेत सामन्यावर पकड मिळविली. शिवनेरी जुन्नर संघाचा स्टार खेळाडू अक्षय जाधव या सामन्यात आपल्या प्रभाव दाखवू शकला नाही. यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

वेगवान पुणे संघाच्या गणेश कांबळे याने 12 गुणांची कमाई केली. यामध्ये 10 गुणांसह 2 बोनस गुण मिळविले. विवेक घुले याने 7 गुण मिळविले. त्यांना चेतन पारधे याने 4 व सचिन पाटील यांने उत्कृष्ट पकडींचे 3 गुण घेत सुरेख साथ दिली. शिवनेरी जुन्नर संघाच्या अक्षय जाधव याने 8 गुण मिळविले, यामध्ये 5 गुणांसह 3 बोनस गुणांचा समावेश होता. अभिमन्यू गावडे याने 8 गुण, प्रथमेश निघोट याने 2 गुणांसह 4 गुण मिळवीत केलेला प्रतिकार अपुरा ठरला.
पुरुष गटातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार वेगवान पुणे संघाच्या गणेश कांबळेला देण्यात आला. पुरुष गटातील उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार वेगवान पुणे संघाच्या सचिन पाटीलने पटकावला, तर पुरुष गटातील उत्कृष्ट चढाईवीर हा पुरस्कार शिवनेरी जुन्नर संघाच्या अक्षय जाधवने संपादन केला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील, स्पर्धेचे मुख्य संयोजक व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष नगरसेवक बाबूराव चांदेरे, संग्राम कोते, संजोग वाघिरे, वासंती बोर्डे सातव, मधुकर नलावडे, भाऊसाहेब करपे, दत्ता झिंजुर्डे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव व शकुंतला खटावकर, पूजा कड, रूपाली चाकणकर, नामदेव तापकीर, अतुल क्षीरसागर व अर्चना धनकुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)