पुणे – लग्नाचे आमिष दाखविण्याबरोबरच पिस्तुलाच्या धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना हडपसर परिसरात घडली. त्यानंतर तरुणीचा अश्लील व्हिडिओ तयार करून अन्य लोकांना पाठविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकास अटक केली असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रसाद ज्ञानेश्वर तुपे (वय 27, रा. ऍमोनोरा पार्क, हडपसर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे; तर सुरेखा तुपे, सिद्धार्थ तुपे, संभाजी दगडू भंडारे, शंभूराजे तावरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व तरुणीची ओळख होती. त्यांची ओळख वाढल्यानंतर आरोपीने तिला लग्न करण्याचे आश्वासन देत मंदिरामध्ये नेऊन लग्न केल्याचे नाटक केले. त्यानंतर तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणांवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, तरुणीने आरोपीला विरोध दर्शविला. त्यावेळी त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार केला.
या घटनेनंतर आरोपीने तरुणीचे अश्लील व्हिडिओ व छायाचित्रे काढून तावरे यास पाठविले. तावरे याने अन्य लोकांना पाठविले. या सर्व घटनांनंतर तरुणी लग्न झाल्यामुळे आरोपीच्या घरी राहण्यासाठी गेली, त्यावेळी सुरेखा तुपे हिने तिला जबर मारहाण करीत विष पाजुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.