पुणे – रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय)ने आर्थिक निर्बंध लादलेल्या रुपी को ऑप. बॅंकेच्या विलिनीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. आर्थिक सक्षम असणाऱ्या एखाद्या बॅंकेत रुपी बॅंकेचे विलिनीकरण करू, असे आश्वासन नुकतेच त्यांनी दिले आहे.
रुपी बॅंक ठेवीदार हक्क समिती व पुणेकर नागरिक कृती समितीच्यावतीने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. यावेळी फडणवीस यांनी हे आश्वासन दिले. यापूर्वी सुद्धा समितीच्यावतीने तीन बैठका मुख्यमंत्र्यांसमवेत झाल्या आहेत. आमदार मेधा कुलकर्णी तसेच समितीचे भालचंद्र कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. सध्या रुपी बॅंकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत प्रशासकीय मंडळाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे रुपी बॅंकेच्या तोट्यात ही घट झाली आहे. त्याचबरोबर कर्ज वसुली सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे आता बॅंकेचे एखाद्या आर्थिक सक्षम बॅंकेत विलिनीकरण होऊ शकते.
त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी आपण एखाद्या बॅंकेत रुपीच्या विलिनीकरणासाठी सूचना करू, असे सांगितले आहे. त्यामुळे रुपीचे ठेवीदार व खातेदारांना थोडा दिलासा मिळाला आहे.