पुणे – रिक्षापरमिट देताना नियम धाब्यावर

आरटीओकडून काहींना वेळेपुर्वीच परमिट : रिक्षा संघटनाचा आरोप

पुणे – रिक्षाचालकांना देण्यात येणारे परवाने शासनाकडून खुले करण्यात आले आहेत. परमिटसाठी आरटीओ कार्यालयाकडून अर्ज मागवून ऑनलाइन तारीख देण्यात येत आहे. नियमानुसार मिळालेल्या तारखेनंतर परमिट वितरण होणे गरजेचे आहे. मात्र, आरटीओकडून काही जवळच्या व्यक्तींना तसेच एजंटांना वेळेपूर्वीच परमिट दिले जात असल्याचा आरोप शिवनेरी रिक्षा संघटनेकडून करण्यात आला आहे. अशा पध्दतीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रिक्षा परमिटसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जदाराने अर्ज केल्यास त्याला साधारण पाच ते सहा महिन्यांनंतरची तारीख मिळते. या तारखेच्या दिवशी कागदपत्रांची तपासणी करून साधारणपणे पुढील एका महिन्यात संबंधित अर्जदाराला परमिट देण्यात येते. मात्र, आरटीओतील काही अधिकारी व एजंट यांची साखळी तयार झाली आहे. यामुळे काही जवळच्या व्यक्तीला अपॉईंटमेंट तारखेपूर्वीच परमिट दिले जात असल्याचा आरोप शिवनेरी संघटनेचे आबा बाबर यांनी केला आहे. यामुळे नियमानुसार अर्ज केलेल्या रिक्षाचालकांवर अन्याय होत असून याबाबत परिवहन आयुक्त यांना निवदेन देण्यात आले आहे. तसेच, रिक्षाचालकांवरील अन्याय न थांबल्यास पुढील काळात संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×