पुणे – राज्य परीक्षा परिषदेतील कार्यालये आता शिक्षक भवनात

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेसाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार असून जूनी कार्यालये शिक्षक भवनामध्ये येत्या पावसाळ्यापूर्वी स्थलांतरित करण्यात येणार असून त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्य परीक्षा परिषदेची स्वत:च्या मालकीची एक एकर जागा आहे. या जागेत सध्या अनेक वर्षापासून परिषदेच्या विविध कार्यालयांच्या माध्यमातून कामकाज चालते आहे. आता ही कार्यालये खूप जूनी झाली असून त्यांची दूरवस्था झाली आहे. परिषदेच्या कामकाजाचा व्यापही वाढत चालला असून कार्यालयांसाठी आता नवीन इमारतीची गरज आहे. नवीन इमारतीसाठी सुमारे 70 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार नेमण्यात येणार आहे. यासाठी पहिल्यांदा मागविण्यात आलेल्या ई-निविदांमध्ये ठेकेदारांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच या सर्वच निविदा अपात्र ठरविण्यात आल्या होत्या. त्यामुळे फेरनिविदा मागविण्यात आल्या होत्या. यात आठ ठेकेदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. या निविदांमधील कागदपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर गुणदानाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. कार्यकारी समितीच्या मान्यतेनंतर राज्य समितीची मान्यता घेऊन अंतिम सल्लागाराची निवड निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यास कामाचे आदेश देण्यात येणार आहेत. इमारतीच्या बांधकामाचे आराखडे तयार करणे, शासकीय विभागाकडून आवश्‍यक त्या बांधकाम व इतर परवानग्या मिळविणे, बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविणे ही सर्व कामे सल्लागारामार्फतच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी जूनी कार्यालये हलविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी कार्यालयातील साहित्याची बांधाबांध करण्याची सूचनाही टप्प्याटप्प्याने सर्व कार्यालयांना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही नवीन प्रशासकीय इमारतीची उत्सुकता लागलेली आहे. या इमारतीचे काम पूर्ण होण्यासाठी किमान दोन-तीन वर्षांचा कालावधी लागणार हे स्पष्टच आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.