पुणे – राज्यात गळीत हंगाम अंतिम टप्प्यात

पुणे – राज्यात गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून आतापर्यंत राज्यात तब्बल 900 लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा 1 कोटी क्‍विंटलने हे उत्पादन अधिक आहे.

यंदाच्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे गळीत हंगाम हा फारसा लांबणार नाही. सध्याच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आपल्याकडे असणारा ऊस कारखान्यांकडे नेण्यासाठी लगबग करीत आहेत. मार्चमध्ये पाणी मिळणेसुद्धा अवघड होणार आहे. अशावेळी पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाणीसाठा ठेवावा लागणार आहे. हे लक्षात घेऊन सध्या राज्यातील सर्वच कारखाने वेगाने गाळप करत आहेत.

राज्यातील तब्बल 193 कारखान्यांमध्ये सध्या गाळप सुरू आहे. त्यात 101 कारखाने हे सहकारी तर, 92 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक कारखाने हे पुणे विभागात सुरू आहेत. पुणे विभागात 62 साखर कारखाने सुरू आहेत. त्यानंतर कोल्हापूर विभागात 38 कारखाने सुरू आहेत. नांदेड विभागात 35 कारखाने सुरू आहेत. अहमदनगरमध्ये 28 तर औरंगाबादमध्ये 24 कारखाने सुरू आहेत.

राज्यात आतापर्यंत 817.12 लाख मेट्रीक लाख टन उसाचे गाळप झाले आहेत, त्यातून 900.80 लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत 730.02 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले होते, तर 799.38 लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी पाऊसपाणी चांगला झाला असल्याने गाळप हंगाम मे महिन्याच्या अखेरपर्यंत सरू राहिला होता; पण यंदा परिस्थिती तशी नाही. साखर कारखान्यांच्या अंदाजानुसार मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत अनेक कारखान्यांचा गाळप हंगाम संपुष्टात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.