पुणे – ‘या’ निर्णयाचा फटका राज्यकर्त्यांना बसणार हे नक्‍की!

हेल्मेटसक्तीमुळे चालकांची संतप्त प्रतिक्रिया : इतरही समस्यांचे काय, नागरिकांचा प्रश्‍न

कोंढवा – वाहतूक पोलिसांकडून दुचाकीचालकांवर हेल्मेटसाठी कारवाई होत असल्यामुळे दुचाकीचालक प्रचंड त्रासले आहेत. एकीकडे कंपन्या बंद पडत आहेत. शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे रोजगार नाही. ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांना चारा नाही. पाणी नाही, अशी भयानक अवस्था आहे. रस्त्यांची कमालीची दुरवस्था झालेली आहे.वाहतूक कोंडीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. गुन्हेगारी, खून, दरोडे मारामाऱ्या या घटना रोजच घडत असून हे सर्व थांबविण्याची खरी गरज असताना प्रशासन मात्र, विनाहेल्मेट दुचाकीचालकांच्या मागे लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचा मोठा फटका आगामी निवडणुकीत राज्यकर्त्यांना बसणार हे नक्की, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहर व उपनगरांमध्ये प्रत्येक रस्ता वाहनांची खच्चून भरला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खिळखिळी झाली आहे. एकही रस्ता बिगर खड्ड्यांचा नाही. प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे, त्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र, दुचाकीचालकांनी हेल्मेट घातले नाही म्हणून कारवाई धडाका सुरू केला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना पाहून अनेकजण यू-टर्न घेत आहेत. कारण रोजगार मिळतो 200 रुपये आणि दंड भरावा लागतो 500 रुपये, अशा परिस्थितीत 300 रुपये आणायचे कोठून, असा प्रश्‍न चालकांना पडला आहे.शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी बसेस वेळेवर येत नाहीत, त्यामुळे कोणाला तरी हात करतात, ते दुचाकीचालक मुलांना टिपलसीट घेऊन जातानाही पोलीस मामा कारवाई करतात, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

शहर आणि ग्रामीण भागात काही वेगळी परिस्थिती नाही. शहरामध्ये पिण्यासाठी पाण्याची समस्या तीव्रतेने जाणवू लागली आहे. तर, ग्रामीण भागात पशुधन जगविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. चारा आणि पाणी मिळविण्यासाठी रात्र-दिवस धडपड करताना दिसत आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षांचा कालावधी सुरू झाला आहे. त्यांची चिंता वेगळीच आहे. राज्यामध्ये अशी भयानक परिस्थिती असताना दुचाकीचालकांनी हेल्मेट घातले नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे दिसत आहे.

चौकामध्ये वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वाहतूक पोलिसांचा ग्रुप हेल्मेट नसलेल्या एका दुचाकीचालकाकडे धाव घेतात. चोर-दरोडेखोर-अतिरेक्‍याला पकडल्याच्या अविर्भावात त्याला गुन्हेगारी स्वरुपाची वागणूक देतात. लोकशाही आहे की, ठोकशाही आहे, असा प्रश्‍न आता सामान्यांना पडला आहे. हेल्मेटसाठी एवढा खटाटोप कशासाठी केला जात आहे, याचे कोडे सामान्यांना उलगडलेले नाही.

जानेवारी महिना उजाडला आणि दुचाकीचालकांसाठी हेल्मेटचा कर्दनकाळ उभा राहिला आहे. आता हेल्मेट कसे असावे आणि कसे नसावे याबाबत काही निकष आहेत. मात्र, वाहतूक पोलीस कारवाई करतात. त्यांच्याच बाजूला निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटची विक्री केली जात आहे. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी काही दुचाकीचालक हेल्मेट खरेदी करतात. मात्र, वाहतूक पोलीस आयएसआय मार्क नसेल, तर कारवाई करतात. मग निकृष्ट दर्जाचे हेल्मेट घातल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा विक्री करणाऱ्यावर का कारवाई करत नाही, असा प्रश्‍न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

वाहतूक सुरळीत करण्याकडे लक्ष द्या!
हेल्मेट नसलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यासाठी वापरली जाणारी वाहतूक यंत्रणा वाहतूक सुरळीत करण्यासाठी वापरली तर, अर्धेअधिक अपघात कमी होतील. हेल्मेट नसलेले दुचाकीचालक पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी वेडीवाकडी वाहने पळवितात, त्यामुळे अपघात होत आहेत. याकडेही पाहणे गरजेचे आहे, असा सबुरीचा सल्ला सूज्ञांकडून दिला जात आहे. कोंढवा वाहतूक शाखेसमोर कारवाई हेल्मेट नसलेल्यांवर कारवाई केली जाते. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना थांबून ही कारवाई सुरू असल्यामुळे अनेक वाहनचालक घाबरुन वेगाने वाहने चालवतात, अशावेळी अपघात होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे हेल्मेटसक्ती करण्याऐवजी बेशिस्त वाहनांवर, अवैध पार्किंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करून वाहतूक सुरळीत करण्याकडे पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)